कणकवली कोविड केंद्रातील निकृष्ट आहाराविषयी रुग्णांनी आवाज उठवल्यावर आहाराची गुणवत्ता सुधारली

निकृष्ट आहारावर रुग्णांनी घातला होता बहिष्कार

कणकवली – तालुक्याचे ‘कोविड केंद्र’ हरकुळ येथे आहे. या केंद्रात तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत; मात्र येथे निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते, असा आरोप करत केंद्रातील रुग्णांनी ३ एप्रिलला जेवणावर बहिष्कार घातला. याची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणा जागी झाली अन् अधिकार्‍यांनी अन्न पुरवणार्‍या ठेकेदाराला सक्त सूचना दिल्यावर ४ एप्रिलपासून चांगल्या गुणवत्तेचेे जेवण रुग्णांना दिले जाऊ लागले.

या केंद्रात १८ रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांनी जेवणाच्या गुणवत्तेविषयी तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना लक्ष देण्याची सूचना केली, तसेच कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी तातडीने नोंद घेत कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. रुग्णांना शासनाच्या धोरणानुसार केळी, दूध, चांगले जेवण यांचा समावेश असलेला सकस आहार देण्याचे आदेश रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सी.एम्. शिकलगार यांना दिले. चांगले जेवण न दिल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी तहसीलदार पवार यांनी दिली. प्रशासकीय यंत्रणेचा दबाव आल्यानंतर संबंधित ठेकेदाराने रुग्णांना चांगले जेवण देण्यास प्रारंभ केला.