मुंबई – मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ३ एप्रिल या दिवशी अन्य राज्यांतील, तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी गावाला जाण्यासाठी मोठी गर्दी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २ एप्रिल या दिवशी जनतेशी साधलेल्या ‘ऑनलाईन’ संवादामध्ये ‘येत्या २ दिवसांत दळणवळण बंदीविषयी निर्णय घेण्यात येईल’, असे म्हटले होते. मागील वर्षी अचानक करण्यात आलेल्या दळणवळण बंदीमुळे अनेक परप्रांतीय कामगारांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. रेल्वे बंद केल्यामुळे अनेकांवर चालत गावाला जाण्याची वेळ आली होती. पुन्हा असा त्रास होऊ नये, यासाठी दळणवळण बंदी घोषित होण्यापूर्वी या नागरिकांनी गावाला जाण्याचा निर्णय घेतला आहे, असेच रेल्वेस्थानकांवर अचानक वाढलेल्या गर्दीतून दिसून येते.