दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी विशेष शासकीय अधिवक्ता म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा !

देवेंद्र फडणवीस यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुंबई – दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी भारतीय प्रशासकीय सेवेतील महिला अधिकार्‍याच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात येऊन विशेष शासकीय अधिवक्ता म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, या प्रकरणात अटकेत असलेले निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना बडतर्फ करून त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवण्यात यावा. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना सहआरोपी करून त्यांनाही अटक करून बडतर्फ करण्यात यावे. वरिष्ठांच्या छळामुळे महिला अधिकार्‍याला आत्महत्या करावी लागणे, हे पुरोगामी महाराष्ट्राला मुळीच शोभणारे नाही. खरेतर फौजदारी कारवाई चालू असतांना खातेनिहाय चौकशी होणे आवश्यक असते. तसे आदेश न काढता अंतर्गत चौकशी समिती नेमण्याचा घाट कशासाठी ?  प्रत्येक टप्प्यात आंदोलन केल्याविना सरकार हलत नाही. आम्हाला प्रश्‍न पडला आहे की, प्रत्येक आरोपीला वाचवण्याचा महाविकास आघाडीचा अट्टाहास का ?