एका महानगरातील घटस्फोट घेणार्यांच्या संख्येवरून संपूर्ण भारतात या सामाजिक प्रश्नाने किती भीषण रूप धारण केले आहे, याचा अंदाज येऊ शकतो. ‘केवळ धर्मशिक्षणामुळेच कुटुंबसंस्था पर्यायाने समाजव्यवस्था बळकट होऊ शकेल’, असे म्हटल्यास चूक ते काय ?
पुणे, ३ एप्रिल – किरकोळ वाद आणि अहंकारातून गेल्या काही वर्षांपासून घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या वर्षी दळणवळण बंदीच्या कालावधीत घटस्फोट मिळवण्यासाठी शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयात १ सहस्र १९२ दावे प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १ सहस्र ४ दाव्यात परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यात आले आहेत. दाव्यांची आकडेवारी पहाता घटस्फोट मिळवण्यासाठीचे प्रतिदिन ३ ते ४ दावे प्रविष्ट होत असल्याची माहिती समोर आली आहे.
कौटुंबिक न्यायालयाच्या अध्यक्षा अधिवक्त्या वैशाली चांदणे यांनी सांगितले की, दळणवळण बंदीत अनेकांच्या नोकर्या गेल्या, वेतनकपात झाली. अशा परिस्थितीत दाम्पत्यातील वादसुद्धा वाढल्याचे निरीक्षण आहे. अगदी किरकोळ वादातून घटस्फोट मिळवण्याची प्रकरणे वाढली आहेत.