रायगड किल्ल्यावरील उत्खननात सापडली ३५० वर्षांपूर्वीची अडीच तोळे वजनाची नक्षीदार सोन्याची बांगडी !

मुंबई – रायगड प्राधिकरण समितीद्वारे रायगड किल्ल्यावर करण्यात येत असलेल्या उत्खननामध्ये अडीच तोळे वजनाची सोन्याची नक्षीदार बांगडी सापडली आहे. किल्ल्यावरील जगदीश्‍वर मंदिराच्या शेजारी असलेल्या एका वाड्याच्या उत्खननामध्ये ही बांगडी सापडली. ही बांगडी ३५० वर्षांपूर्वीचा अनमोल ठेवा असल्याचे तज्ञांचे मत आहे.

याविषयी बोलतांना खासदार संभाजीराजे भोसले म्हणाले, ‘‘ज्या वाड्यात ही सोन्याची बांगडी सापडली, त्या ठिकाणी मोठा सरदार रहात असल्याची शक्यता आहे. यातून संशोधन करण्याची पुन्हा एक संधी मिळाली आहे. ‘छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून यातून मोठे संशोधन होऊ शकेल’, असे मला वाटते. रायगडावर आढळलेल्या या अनमोल खजिन्यामुळे भविष्यात अनेक ऐतिहासिक खजिना समोर येण्याची शक्यता आहे. पुरातत्व विभागाच्या उत्खननाच्या गतीने उत्खनन करायचे झाले, तर अधिक वेळ लागेल. त्यासाठी रायगड प्राधिकरणाला उत्खननाची अनुमती द्यावी.’’

पुरातत्व विभागाद्वारे रायगड किल्ल्यावर ३५० ठिकाणी उत्खनन करण्यात येणार आहे. मागील २ मासांत किल्ल्यावर उत्खनन करतांना कानातील रिंग सापडल्या होत्या. यापूर्वी किल्ल्यावर शिवकालीन सोन्याची नाणी, बंदुकीची गोळी, तोफेचे अवशेष, नक्षीदार मातीची मडकी, चीनीमातीच्या भांड्यांचे तुकडे, विटा, कौले, तोफागोळे आदी वस्तू आढळून आल्या आहेत.