ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
सोलापूर – संत एकनाथ महाराज षष्ठी साजरी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अनुमती द्यावी. सरकार या उत्सवाला अनुमती देणार नसेल, तर किमान मरणाला तरी अनुमती द्यावी, अशा मागणीचे निवेदन अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संगणकीय पत्राद्वारे पाठवले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, रुग्णसंख्याही वाढत आहे. दळणवळण बंदी करण्याचा विचारही चालू असतांना निवडणुका चालतात, आरक्षण सोडत चालते, विजयोत्सव चालतो, निवडणुकांचा प्रचार चालतो, बाजारपेठा खुल्या असलेल्या चालतात, या सर्व गोष्टी चालत असतील, तर वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमांनाच बंदी का घातली जाते ? नुकतीच झालेली तुकाराम महाराज बीज साजरी करण्यासही सरकारने बंदी घातली. महाराष्ट्र सरकार वारकरी संप्रदायाच्या उत्सवांना अनुमती देणार नसेल, तर किमान मरणाला तरी अनुमती द्यावी. आम्हाला आमच्या परंपरा जोपासण्यास अनुमती मिळत नसेल, तर मृत्यू आलेला चांगला !