गडचिरोली येथील जंगलात झालेल्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार

घनदाट जंगलात नक्षलवाद्यांच्या शिबिराचे आयोजन

नक्षलवाद मूळापासून नष्ट करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत !

गडचिरोली – कुरखेडा उपविभागांतर्गत मालेवाडा पोलीस साहाय्य केंद्राच्या परिसरातील जंगलात नक्षल विरोधी अभियान राबवणारे सी-६० पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक चालू होती. २९ मार्च या दिवशी सकाळी झालेल्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार झाले. त्यात ३ पुरुष आणि २ महिला यांचा समावेश आहे.

या जंगलात नक्षलवाद्यांचे शिबिर चालू असून मोठ्या प्रमाणात नक्षलवादी सहभागी झाले आहेत, अशी माहिती गोपनीय सूत्रांकडून पोलिसांकडून मिळाली होती. (नक्षलवाद्यांची शिबिरे आयोजित केली जातात, यावरूनच तो किती प्रमाणात फोफावला आहे, याची कल्पना येते. अशा शिबिरांच्या आयोजनातून दिवसेंदिवस भयावह होणार्‍या नक्षलवादाला कायमस्वरूपी संपुष्टात आणायला हवे ! – संपादक) त्यानुसार पोलिसांनी नक्षलविरोधी अभियानाला प्रारंभ केला. दबा धरून बसलेल्या ६० ते ७० नक्षलवाद्यांनी सी-६० सैनिकांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल आणि स्वरक्षणासाठी सैनिकांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. या वेळी अनुमाने ६० ते ७० मिनिटे चकमक चालू होती. पोलसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पळून गेले.

नक्षलवाद्यांच्या पहिल्या ठिकाणावरून ३०३ रायफली, काडतूसे, ३ प्रेशर कुकर बॉम्ब, नक्षल डांगरी ड्रेस, दोन सोलर प्लेेट, वायर बंडल, सुतळी बॉम्ब, तसेच मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा अन् नक्षलवाद्यांचे दैनंदिन वापराचे साहित्य सापडले आहे.