पुरुषांचे अलंकार आणि ते परिधान केल्यावर होणारे लाभ

१. तेजाच्या स्तरावर सूर्यनाडीद्वारे सतत सजगता आणि कार्यरतता टिकवणे शक्य होणे

‘पूर्वीच्या काळी राजांच्या डोक्यावर असणारा मुकुट हा डोक्याच्या परिघावरील बिंदूंवर गोलाकार पद्धतीने सारखाच दाब निर्माण करून त्यात सामावल्या गेलेल्या पोकळीद्वारे ब्रह्मांडातील शक्तीतत्त्वात्मक लहरींना स्वतःकडे आकृष्ट करून देहात तेजाचे संवर्धन करण्यास पूरक ठरत असे. त्यामुळे त्यांना तेजाच्या स्तरावर सूर्यनाडीद्वारे सतत सजगता आणि कार्यरतता टिकवणे शक्य होत असे.’

– सूक्ष्म जगतातील एक विद्वान (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २२.१०.२००७, रात्री ८.३३)

२. सात्त्विक राजांनी सुवर्णमुकुट धारण केल्याने त्यांची बुद्धी सात्त्विक होऊन देवतांकडून ज्ञान ग्रहण करता येणे आणि योग्य निर्णय देता येणे

‘सात्त्विक राजांनी मुकुट धारण केल्यामुळे त्यातील सात्त्विकतेमुळे त्यांची बुद्धी सात्त्विक होत असे. ब्रह्मदेव आणि श्री सरस्वतीदेवी यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या ज्ञानलहरी ते सहजपणे ग्रहण करू शकत होते. त्यामुळे त्यांची सखोल विचार करण्याची वृत्ती होती आणि त्यांची निर्णयक्षमताही चांगली होती. ते प्रजेला योग्य निर्णय द्यायचे. प्रजेच्या सर्व अडचणींवर उत्कृष्ट उपाययोजना शोधून देत असत. ज्ञानामुळे त्यांची बुद्धी सात्त्विक होऊन त्यांचा विवेक सतत जागृत असे आणि देवतांकडून वेळोवेळी मिळणार्‍या मार्गदर्शनामुळे कठीण प्रसंगातही ते योग्य निर्णय अन् न्याय देत असत. त्यामुळे अशा राजांची सर्व राज्यव्यवस्था सुरळीतपणे चालू असे.

३. मुकुटातील पोकळीमध्ये उच्च देवतांचे निर्गुण तत्त्व कार्यरत असणे

मुकुटातील पोकळीमध्ये उच्च देवतांचे निर्गुण तत्त्व कार्यरत असते. मुकुट धारण केल्यावर राजांना उच्च देवतांच्या सगुण-निर्गुण अशा दोन्ही स्तरांवरील तत्त्वांचा लाभ होऊन ज्ञान, पराक्रम, ऐश्‍वर्य, यश, कीर्ती इत्यादी गुणांची प्राप्ती होऊन त्यांना राजाची कर्तव्ये चांगल्या पद्धतीने पूर्ण करता येत होती.

– ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १२.११.२००७, रात्री ११)

कुंडले

‘पूर्वीच्या काळी ऋषिमुनी आणि राजे कानात कुंडले घालत असत. कुंडले घातल्याने कानांच्या पाळ्यांवर असलेल्या बिंदूवर दाब देऊन जिवाच्या देहात वैराग्यभावाचे संवर्धन होत असे.

भिकबाळी

कानात घालण्यात येणारी भिकबाळी ही पुरुषांच्या संयमीपणात वाढ करणारी, म्हणजेच क्रियेच्या स्तरावर संयम राखणारी आहे.

रुद्राक्षांच्या बंधनमाळा

पूर्वीच्या काळी ऋषिमुनी दंड आणि मनगटे यांवर रुद्राक्षांच्या बंधनमाळा घालत असत. या माळा हातांच्या बिंदूंवर आवश्यक तेवढा दाब देऊन देहाला बलवर्धक असणारी आणि कार्याला स्फूर्ती देणारी शक्ती देहात संक्रमित करत असत अन् कार्यातील उतावीळपणाला वेसण घालत असत.’

– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २२.१०.२००७, रात्री ८.३३)

आता मात्र पुरुष केवळ गळ्यात सोन्याची वा चांदीची साखळी, बोटांत एक किंवा अधिक अंगठ्या आणि काही पुरुष दंडावर रुद्राक्षांच्या माळा हे अलंकार परिधान करतांना आढळतात.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘अलंकारशास्त्र’)