सर्व व्यापारी, दुकानदार आणि व्यावसायिक यांनी स्वतःची कोरोनाविषयक चाचणी करून घ्यावी ! – जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

व्यापारी, दुकानदार आणि व्यावसायिक यांची कोरोनाविषयक चाचणी

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलण्यास जिल्हा प्रशासनाने प्रारंभ केला आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व व्यापारी, दुकानदार आणि व्यावसायिक यांनी स्वतःची कोरोनाविषयक चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक यांनी, तसेच त्यांच्या आस्थापनामध्ये काम करणारे सर्व कर्मचारी, कामगार यांनी

१५ एप्रिलपर्यंत जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय येथे जाऊन आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करून घ्यावी. या सर्व ठिकाणी चाचणीची विनामूल्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय येथून प्राप्त झालेला कोरोना चाचणी अहवाल व्यापारी, कामगार यांनी स्वतःजवळ ठेवणे आवश्यक आहे. १५ एप्रिल २०२१ पर्यंत जे व्यापारी, कामगार यांनी चाचणी करून अहवाल प्राप्त करून घेतला नसल्याचे आढळून येईल, त्यांचे आस्थापन किंवा दुकान जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुढील आदेश मिळेपर्यंत बंद करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

सिंधुदुर्गात कोरोनाचे नवीन २८ रुग्ण

१. आतापर्यंतचे एकूण रुग्ण ६ सहस्र ८४६

२. उपचार चालू असलेले रुग्ण २७०

३. बरे झालेले एकूण रुग्ण ६ सहस्र ३८९

४. मृत्यू झालेले एकूण रुग्ण १८१