सूक्ष्मातून जाणण्याची क्षमता असलेली आणि बालवयातच साधनेचे अन् हिंदु धर्माचे महत्त्व जाणणारी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची रामनाथी आश्रमातील कु. भक्ती रोहन मेहता (वय ९ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. भक्ती रोहन मेहता ही एक आहे !

कु. भक्ती रोहन मेहता

फाल्गुन पौर्णिमा (२८.३.२०२१) या दिवशी रामनाथी आश्रमातील कु. भक्ती रोहन मेहता हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. भक्ती रोहन मेहता हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ –  परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. शिकण्याची वृत्ती

‘भक्ती जिज्ञासू आहे. कोरोना महामारीमुळे ‘ऑनलाईन’ शाळा चालू असतांना ती ६ मासांत संगणक शिकली. ती टंकलेखन आणि ‘गूगल सर्च’ करू लागली आहे. ती भाजी निवडणे, केर काढणे, तसेच प्रसाधनगृहाची स्वच्छता करणे, या गोष्टीही शिकत आहे.

२. एका लहान मुलाच्या वाढदिवसाला गेलेल्या भक्तीच्या मनात त्या मुलाविषयी ईर्ष्येचे विचार आल्यावर तिने ते आईला प्रामाणिकपणाने सांगणे आणि मनातील अयोग्य विचारांवर मात करून ‘वाढदिवसाची हिंदु धर्मातील प्रथाच योग्य आहे’, असे स्वतःहून सांगणे

एकदा ती एका लहान मुलाच्या वाढदिवसाला गेली होती. तेथून घरी आल्यावर तिने मला सांगितले, ‘‘आई, माझ्या मनात ईर्ष्येचे विचार आले. माझ्या वाढदिवसाला आपण केक, फुगे किंवा भेटवस्तू दिली नाही. त्या मुलाचा साजरा केलेला वाढदिवस पाहून मला त्याचा हेवा वाटला. हे अयोग्य आहे ना ? माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तू माझे औक्षण करतेस. बालसाधक माझ्यासाठी शुभेच्छापत्र बनवतात. मला संतांचा आशीर्वाद मिळतो. आपले केक न कापायचे शास्त्र अगदी योग्य आहे.’’ तेव्हा माझ्या मनातील तिच्याविषयीची काळजी नष्ट झाली. ‘भक्ती समाजातील व्यक्तीत मिसळल्यावर तिच्यावर वाईट संस्कार होऊ शकत नाहीत’, याची मला निश्‍चिती झाली. तेव्हा मी ठरवले, ‘भक्तीला समाजात मिसळू द्यायचे, म्हणजे तिचे योग्य-अयोग्य गोष्टींचे चिंतन होऊन ती घडणार आहे.’ देवच भक्तीला घडवत आहे.

३. ऑस्ट्रेलियातील स्वच्छता, उद्याने, फळफळावळ आदी बाह्य गोष्टींनी प्रभावित न होता साधनेच्या दृष्टीने भारत देश आणि सनातनचे आश्रम यांचे महत्त्व जाणणारी प्रगल्भ भक्ती !

भक्तीचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला; पण ती ११ मासांची असतांना आम्ही रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आलो. त्यामुळे तिचा ऑस्ट्रेलियातील वातावरणाशी फारसा संपर्क आला नाही. ती ७ वर्षांची असतांना आम्ही १ मास ऑस्टे्रलियाला गेल्यावर तिला तेथील स्वच्छता, उद्याने, फळफळावळ इत्यादी पुष्कळ आवडले. मी तिला सहज विचारले, ‘‘तुला ऑस्ट्रेलियात कायमचे रहायला आवडेल का ?’’ ती म्हणाली, ‘‘आई, ऑस्ट्रेलिया ‘माया’ आहे. साधना करायची असेल, तर भारतात राहून साधना करणेच उत्तम आहे. आपल्याला काही पालट हवा असल्यास आपण काही दिवसांसाठी ऑस्ट्रेलियात जाऊ शकतो; पण आश्रम तो आश्रमच ! असे कुठेच मिळणार नाही.’’

४. सूक्ष्मातील गोष्टी जाणणे

४ अ. आईच्या मनात नकारात्मक विचार आल्यास त्याविषयी सूक्ष्मातून जाणणारी आणि आईला योग्य दृष्टीकोन देऊन नामजपाची आठवण करून देणारी भक्ती ! : मी स्वयंपाक करतांना कधीकधी माझ्या मनात नामजप चालू असण्याऐवजी नकारात्मक विचार येतात. त्या वेळी भक्ती घरात कुठेही असली, तरी माझ्याशी बोलायला येते आणि माझ्या मनातील विचार अचूक बोलून दाखवते. ती योग्य दृष्टीकोन देऊन मला त्यातून बाहेरही काढते. तेव्हा मला पुष्कळ आश्‍चर्य वाटते. मी तिला ‘तू माझ्या मनातील विचार कसे ओळखलेस ?’, असे विचारल्यावर ती मला म्हणते, ‘‘आई, श्रीकृष्ण म्हणाला, ‘आईला नामजपाची आठवण कर. तिच्या मनात आता नकारात्मक विचार येत आहेत.’’

४ आ. सतर्क राहून आईकडून भावप्रयोग करून घेणे : भक्ती मधूनमधून भावप्रयोग घेते. त्या वेळी ती मध्येच थांबून मला सांगते, ‘‘आई, लक्ष दे.’’ त्या वेळी खरेच माझ्या मनात अनावश्यक विचार येत असतात. त्यामुळे मी लक्ष केंद्रित करू शकत नाही. ती म्हणते, ‘‘श्रीकृष्ण मला म्हणाला, ‘आईला भावप्रयोगाचा लाभ मिळायला नको; म्हणून मोठ्या अनिष्ट शक्ती तिचे मन भरकटवत आहे.’ आई, तू लढून भावप्रयोगाकडे लक्ष दे.’’

४ इ. आईला आध्यात्मिक त्रास होत असतांना भक्तीने प्राणशक्तीवहन पद्धतीप्रमाणे नामजप शोधून देणे आणि नामजप शोधण्यासाठी आईला स्वयंपूर्ण करणे : दळणवळण बंदीच्या काळात आम्ही घरी असतांना काही वेळा मला आध्यात्मिक त्रास व्हायचा. तेव्हा मी तिला प्राणशक्तीवहन पद्धतीप्रमाणे नामजप विचारायचे आणि ती मला अचूक नामजप शोधून द्यायची. नंतर ती मला सांगू लागली, ‘‘आई, आता तू शोधायचा प्रयत्न कर. श्रीकृष्ण तुलाही निश्‍चितच सांगेल.’’ मी नामजप शोधल्यावर ती म्हणायची, ‘‘अगदी बरोबर आहे. तुला त्रास होत असतांना ‘तू योग्य नामजप शोधून काढत आहेस ना ?’, हे बघण्यासाठी मीही तुझ्यासाठी नामजप शोधला. आई त्रासातही देव तुला ‘कोणता नामजप करायचा ? तो कसा शोधायचा ?’, हे शिकवत आहे.’’ ती मला स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन देते.

४ ई. आध्यात्मिक त्रासावर नामजप शोधण्याची भक्तीची भावपूर्ण पद्धत ! : एकदा मी भक्तीला विचारले, ‘‘तू २ – ३ सेकंदांतच नामजप कसा शोधतेस ? मला तर ५ ते १० मिनिटे लागतात.’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘आई, मी नामजप शोधत नाही. मी केवळ देवाच्या चरणी शरण जाऊन प्रार्थना करते. मग मला स्थान जाणवते आणि दृश्य दिसते. आधी मला श्रीकृष्णाचा हसरा तोंडवळा दिसतो आणि मग तत्त्व ! अग्निदेवाचा जप असेल, तर देव मला अग्नीच्या ज्वाळा दाखवतो. वायुदेवाचा जप असला, तर मला वारा सुटतांना दिसतो. देवच शोधून मला तसे सांगतो.’’

४ उ. बालकाचे छायाचित्र पाहून त्याची आध्यात्मिक पातळी अचूकपणे सांगणारी भक्ती ! : एकदा मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आलेला ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या दैवी बालकाचा लेख वाचत होते. त्या बालकाचे संगणकातील छायाचित्र भक्तीला दाखवून मी तिला विचारले, ‘‘या दादाकडे बघून तुला काय जाणवते ?’’ ती म्हणाली, ‘‘हा दादा पुष्कळ सात्त्विक आहे. ‘तो लवकरच संत बनेल’, असे वाटते.’’ मी तिला विचारले, ‘‘त्याची आध्यात्मिक पातळी किती असेल ?’’ ती २ – ३ सेकंद डोळे मिटून म्हणाली, ‘‘त्याची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के असावी.’’

५. स्वभावदोष

अ. भक्ती आळशी आहे. तिच्यात अव्यवस्थितपणा आहे.

आ. ती सध्या मधेच उद्धटपणे बोलू लागली आहे. तिच्या मनासारखे झाले नाही की, तिला राग येतो. नंतर थोड्या वेळाने तिला चुकीची जाणीव होऊन ती क्षमा मागते.’

– सौ. प्राची मेहता (आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.२.२०२१)


यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेव्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक