तिलारी कालव्याला पाणी येत नसल्याने इन्सुली ग्रामस्थांचा शाखा अभियंत्याला घेराव

तिलारी धरण

सावंतवाडी – तिलारी धरणाचे पाणी इन्सुली गावात येत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी येथे आयोजित बैठकीत शाखा अभियंता लवांगरे यांना घेराव घालून  खडसावले. कोणत्याही परिस्थितीत यावर्षी कालव्यातून इन्सुली गावात पाणी आलेच पाहिजे, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

तिलारी धरणाच्या कालव्याचे काम चालू होऊन १५ वर्षे होत आली, तरी इन्सुली गावात अद्याप पाणी न आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. (कालव्याचे काम १५ वर्षे चालू आहे, एवढा उशीर व्हायला काय कारण आहे, हे वरिष्ठ अधिकारी बघणार का ? आणि जनतेवर होणारा अन्याय दूर करणार का ? याचा अर्थ काय घ्यायचा ? काम जनतेसाठी चालू आहे कि ठेकेदार अन् अधिकारी यांच्यासाठी चालू आहे, असे समजायचे ? – संपादक) या विषयावर चर्चा करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला उपस्थित शाखा अभियंता लवांगरे यांना सरपंच तात्या वेंगुर्लेकर आणि ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांनी खडसावले. ‘जोपर्यंत इन्सुलीत पाणी येत नाही, तोपर्यंत या ठिकाणी चालू असलेले जलवाहिनीचे काम बंद करा. वरिष्ठ अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत बैठकीतून तुम्हाला जाऊ देणार नाही’, अशी चेतावणी या वेळी अधिकार्‍यांना देण्यात आली.

या बैठकीला माजी उपसरपंच कृष्णा सावंत, ग्रामपंचायत सदस्य वर्षा सावंत, मराठा समाज अध्यक्ष नितीन राऊळ, शिवसेना विभागप्रमुख फिलिप्स रॉड्रीग्स, ग्रामविकास अधिकारी चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.