१ एप्रिलपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वयअसणार्‍या सर्व नागरिकांना लस मिळणार !

केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय

प्रकाश जावडेकर

नवी देहली – केंद्रीय मंत्रीमंडळाने १ एप्रिलपासून चालू होणार्‍या चौथ्या टप्प्याच्या लसीकरणामध्ये ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणार्‍या सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास अनुमती दिली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. तसेच लसीच्या २ डोसमध्ये ४ किंवा ६ आठवड्यांचा वेळ असावा,  असे निश्‍चित करण्यात आले होते; मात्र आता कोविशिल्डचा डोस ४ ते ८ आठवड्यांच्या काळात घेणे योग्य ठरेल, असे संशोधकांना दिसून आले आहे. त्यामुळे ही सवलतही देण्यात आली आहे, असेही जावडेकरांनी सांगितले.

जावडेकर म्हणाले की, देशात आतापर्यंत ४ कोटी ८५ लाख कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी ४ कोटींपेक्षा अशा व्यक्ती आहेत, ज्यांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, तर ८५ लाख व्यक्तींना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. मागील आठवड्यामध्ये दिवसाला लसींचे २० लाख डोस देण्यात आले. कोरोनाची लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.