वणवा लागल्याच्या प्रकरणी सातारा येथे मुख्याध्यापक आणि शिक्षिका यांना प्रत्येकी ५ सहस्र रुपये दंड

सातारा, २२ मार्च (वार्ता.) – वाई तालुक्यातील रेणावळे येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी पार्टे आणि शिक्षिका नीलिमा खरात यांना वाई येथील न्यायालयाने प्रत्येकी ५ सहस्र रुपये दंड ठोठावला आहे. शाळेच्या आवारातील पालापाचोळा गोळा करून मुख्याध्यापक पार्टे आणि शिक्षिका खरात यांनी त्याला आग लावली. ही आग वार्‍याने पसरल्यामुळे शेजारील गवताने पेट घेतला. यामध्ये वनक्षेत्रातील २२ हेक्टर परिसर जळून खाक झाला. त्यामुळे वनविभागाची अनुमाने २२ सहस्र रुपयांची हानी झाली. या प्रकरणी वाई येथील वनक्षेत्रपाल महेश झांझुर्णे यांनी दोघांना कह्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंद केला. २० मार्च या दिवशी न्यायालयाने त्यांना दंड ठोठावला.

वणवा लावल्यास दंड आणि शिक्षा

वणव्यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होते. याचे पर्यावरणावरही दुष्परिणाम होतात. गत ३ वर्षांत वणवा लावल्याप्रकरणी ३५ गुन्हे नोंद करून ४४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून ६१ सहस्र रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. वणवा लावल्यास संबंधितांना दंड आणि शिक्षा दोन्ही होऊ शकते. त्यामुळे वणवा लावू नये, असे आवाहन वाई येथील वनक्षेत्रपाल महेश झांझुर्णे यांनी नागरिकांना केले आहे.