कोरोनासंबंधी निर्बंधांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आणि आस्थापने यांच्यावर कठोर कारवाई करणार ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

पणजी – गोव्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर कोरोना महामारीविषयी असलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करणार असल्याची चेतावणी शासनाने दिली आहे.

आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे म्हणाले,‘‘कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी असलेले निर्बंध (एस्.ओ.पी.), तसेच मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे आदी नियम यांचे उल्लंघन करणार्‍यांवर आरोग्य खात्याचे अधिकारी कठोर कारवाई करणार आहेत. उपाहारगृहे, हॉटेल आणि मनोरंजनाची ठिकाणे (एंटरटेनमेंट झोन) शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे कठोरतेने पालन करत आहेत कि नाहीत, याचे निरीक्षण केले जाणार आहे. अशा एखाद्या ठिकाणी निर्बंधांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी त्याविषयी [email protected] यावर संपत्राद्वारे माहिती द्यावी आणि संबंधितावर कारवाई केली जाणार आहे.’’ (समुद्रकिनार्‍यांवर, तेथील नाईट क्लब, उपाहारगृहे आदी ठिकाणी पर्यटक निर्बंधांचे पालन करत नव्हते आणि पोलीस ते पाहूनही कारवाई करत नव्हते. त्या वेळी पोलीस कठोर राहिले असते, तर ही स्थिती टळली नसती का ? – संपादक)

ढवळी, फोंडा येथील मातृछाया या मुलींच्या हॉस्टेलमध्ये १८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले हॉस्टेल ‘मायक्रो कंटेनमेंट झोन’ घोषित

ढवळी, फोंडा येथील मातृछाया या युवती हॉस्टेलच्या इमारतीत १८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. येथील एकूण ४५ विद्यार्थी आणि १७ कर्मचारी यांची कोरोनाविषयक चाचणी करण्यात आली असता १८ जण कोरोनाबाधित आढळले. यामधील काही जणांचा चाचणी अहवाल अजूनही यायचा आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी मातृछाया युवती हॉस्टेल हा विभाग लघु प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट झोन) घोषित केला आहे.

शाळा आणि महाविद्यालये यांचे प्रत्यक्ष वर्ग रहित करण्याची ‘नूसी’ची मागणी

राज्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येईपर्यंत शाळा आणि महाविद्यालये यांचे प्रत्यक्ष वर्ग रहित करण्याची मागणी ‘नूसी’ या विद्यार्थी संघटनेने केली आहे.