‘सत्गुरु फाऊंडेशन’ तथा ‘सद्गुरु युथ फेडरेशन’ यांच्या वतीने ‘ॐ नमो नारायणाय’ कार्यक्रमाचे आयोजन
कुडंई – गोव्यातील समुद्रकिनारे गोव्याला लाभलेले दैवी वरदान आहेत. समुद्रकिनारे हे उपासनेचे स्थान आहे. गोव्याचा सांस्कृतिक वारसा जगभर सकारात्मक पद्धतीने पोचवणे काळाची आवश्यकता आहे. गोव्याच्या तरुणाईला सांस्कृतिक गोष्टींमध्ये समाविष्ट करून येणार्या पिढीला सांस्कृतिक वारसा बहाल करावा, या उद्देशाने श्री दत्त पद्मनाभ पीठ, पिठाधीश्वर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने ‘सत्गुरु फाऊंडेशन’ तथा ‘सद्गुरु युथ फेडरेशन’ यांच्या वतीने रविवार, २१ मार्च या दिवशी मोरजी येथील समुद्रकिनार्यावर ‘ॐ नमो नारायणाय’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची विशेषतः गोव्यातील तरुणांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होत आहे. युवा आणि युवती यांच्या वतीने कुंभपूजन आणि नारीशक्तीद्वारे श्रीमन् नारायण महायाग हे या कार्यक्रमाचे आकर्षण असेल. मोरजी येथील अधिष्ठात्री श्री मोरजाईदेवीच्या देवस्थानाकडून दुपारी ३ वाजता मोरजी समुद्रकिनार्यावर संतांचे भव्य मिरवणुकीने आगमन होणार आहे. दुपारी ठीक ४ वाजता, समुद्रपूजन, सद्गुरुपूजन, महापूर्णाहुती, युवा-युवतींच्या वतीने कुंभपूजन आणि संत आशीर्वचन होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास आध्यात्मिक धर्मगुरु धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी आणि अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आचार्य श्री अविचलदास स्वामीजी यांचे संतसान्निध्य लाभणार आहे.
गोव्यातील तरुण पिढी उच्चविद्याविभूषित, सुसंस्कारित आणि आधुनिक शिक्षणासमवेत धार्मिक शिक्षणातही अग्रेसर असल्याची प्रचीती या कार्यक्रमातून होणार आहे. गोव्याची संस्कृती देश-विदेशात पोचण्यासाठी समुद्रकिनारे हे प्रभावी माध्यम आहे. गोव्यातील तरुण पिढी धर्मकार्यासाठी एकत्रित होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. भारत देश हा कुंभपर्वाच्या पवित्रतेमुळे जगविख्यात आहे. गोमंतकातही भव्यदिव्य स्वरूपाचा कुंभपर्व आयोजित व्हावा, हीच पूज्य स्वामीजींची दिव्य संकल्पना आहे. त्यामुळे मोरजी समुद्रकिनार्यावर होणारा हा कार्यक्रम ‘गोवा कुंभपर्वा’चा शुभारंभ आहे. देशातील ही समृद्ध परंपरा उत्तरोत्तर पिढीकडे पोचवण्याकरिता तरुणांच्या खांद्यावर ही सांस्कृतिक धुरा सोपवण्याची आवश्यकता आहे. धर्मातील यथार्थ ज्ञान आत्मसात करण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ म्हणता येईल. या ऐतिहासिक कार्यक्रमात सर्व गोमंतकीय तरुण-तरुणींनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करून सहभागी होण्याचे आयोजकांनी आवाहन केले आहे.