आज कुठलेही वर्तमानपत्र उघडले की, त्यातील अर्ध्यापेक्षा अधिक बातम्या हत्या, हाणामारी, बलात्कार, तसेच घटस्फोट अशा स्वरूपाच्याच असतात. संशयास्पद वर्तन, जागा घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत म्हणून पत्नीचा केलेला छळ, उसने पैसे परत मागितल्याने केलेली हत्या, तसेच वृद्ध स्त्रिया, मुलगी किंवा नात यांच्यावर धर्मांधांनी केलेला बलात्कार या आणि यांसारख्या अन्य गुन्ह्यांना अंतच नाही. याच्या जोडीलाच काही क्षुल्लक कारणावरून लोखंडी रॉड किंवा हत्याराने केलेली मारहाण या घटना तर अनेकदा मोठमोठ्या सुसंस्कृत म्हणवल्या जाणार्या शहरांमध्ये घडतच असतात. या घटना कधी थांबणार ? त्यांना रोखणार तरी कोण ? गुन्हे करणार्यांच्या मनात धाक निर्माण कधी होणार ? गुन्हेगारीचा वाढता आलेख शून्यावर कधी येणार ? असे अनेक प्रश्न सामान्यांच्या मनात निर्माण होतात. कायदा-सुव्यवस्थेचा धाक न उरल्याने ‘आपले कुणीही वाकडे करू शकत नाही’, ही मानसिकता वाढीस लागत आहे. कुख्यात गुंडांवरील चित्रपटांची निर्मिती करून गुंड प्रवृत्तीचेच उदात्तीकरण केले जाते. यातूनच वरील घटनांमध्ये वाढ होते. आज अनेकांच्या तोंडी आक्रमण, हत्या अशीच भाषा असते.
दायित्वशून्य पोलीस, निष्क्रीय नागरिक, अश्लील आणि हिंसक चित्रपट यांचा समाजव्यवस्थेवरील पगडा, सुसंस्कार अन् धाक यांविरहित चालणारी कुटुंबे आदी अनेक विदारक घटकांची स्थिती गुन्हे जगताच्या निमित्ताने समोर आली आहे. आज कुसंस्कारांच्या परिणामांमुळे ढासळत चाललेली कुटुंब आणि समाज व्यवस्था, तसेच घराघरांतून लोप पावत चाललेले धर्माचरणी रहाणीमान, हेही याला तितकेच कारणीभूत आहे. या परिस्थितीला बदलती जीवनशैली, दूरचित्रवाणी, भ्रमणभाष, इंटरनेट आदींचा वाढता प्रभाव, चंगळवादाचे आकर्षण, आत्मकेंद्रित वृत्ती अशी निरनिराळी कारणेही उत्तरदायी आहेत.
एखादी घटना घडल्यावर उपाय करण्यापेक्षा त्या घडूच नयेत, यासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. धर्मशिक्षणाच्या अभावीच गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि अत्याचार वाढत आहेत. प्रत्येक कुटुंबात संस्कारांची रुजवण करायला हवी. जनतेला नैतिक, सुसंस्कारित आणि संयमी करण्यासाठी धर्मशिक्षण देणे अन् कठोर शिक्षेची तात्काळ कार्यवाही यांवर भर द्यायला हवा. तसे झाल्यासच गुन्ह्यांचे प्रमाण नक्कीच घटेल.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे