अर्थसंकल्पाविषयीच्या आगामी विधानसभा अधिवेशनाची समयमर्यादा अल्प करावी ! – विरोधी पक्षांची मागणी

पणजी, १८ मार्च (वार्ता.)  राज्यात नगरपालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असल्याने अर्थसंकल्पाविषयीच्या आगामी विधानसभा अधिवेशनाची समयमर्यादा अल्प करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी राज्यपाल बी.एस्. कोश्यारी आणि गोवा राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे केली आहे. विरोधी पक्षांपैकी काँग्रेसचे नेते दिगंबर कामत, गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई आणि मगो पक्षाचे नेते श्री. सुदिन ढवळीकर यांनी १७ मार्चला झालेल्या व्यवसाय सल्लागार समितीच्या बैठकीत याविषयी चिंता व्यक्त केली.

मगो पक्षाचे नेते श्री. सुदिन ढवळीकर १७ मार्चला पत्रकारांना म्हणाले, ‘‘आचारसंहिता लागू असतांना शासनाने दीर्घ कालावधीचे विधानसभा अधिवेशन घेणे योग्य नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्प सादर केल्याचे सत्र झाल्यानंतर विधानसभा विसर्जित करून आचारसंहिता संपल्यावर पुन्हा विधानसभा घ्यावी.’’इतर ५ नगरपालिकांच्या निवडणुकीचा दिनांक अजून घोषित झालेला नाही. अर्थसंकल्पाविषयीचे विधानसभा अधिवेशन २४ मार्चला चालू होऊन १६ एप्रिल या दिवशी संपणार आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री डॉ. सावंत विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार सांभाळल्यावर त्यांचा हा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे.

विरोधी नेत्यांकडून राज्यपालांची भेट

१८ मार्चला काँग्रेसचे दिगंबर कामत, मगोचे श्री. सुदिन ढवळीकर, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, आमदार प्रसाद गावकर आणि राष्ट्रवादीचे जुझे डिसोझा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना विधानसभा अधिवेशनाचा कालावधी अल्प करण्याविषयीचे निवेदन दिले.