छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि अनेक नरविरांच्या रक्ताने पावन झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ‘किल्ले विशाळगडा’वर धर्मांधांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून त्यांनी संपूर्ण विशाळगडाचे ‘इस्लामीकरण’ करण्याचे षड्यंत्र रचले आहे. विशाळगडावर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या या अतिक्रमणाकडे धृतराष्ट्र-गांधारी वृत्तीचा पुरातत्व विभाग, ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे या गडाचे पावित्र्य राखण्यासाठी हिंदूंनाच कंबर कसावी लागणार आहे. विशाळगडाचे ऐतिहासिक महत्त्व आणि या गडावरील अतिक्रमण दूर सारून तेथे पूर्वीचे वैभव निर्माण होण्यासाठी काय करायला हवे ? याचा ऊहापोह या लेखात करण्यात आला आहे.
संकलक : श्री. बाबासाहेब भोपळे, हिंदु जनजागृती समिती अन् ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’चे सदस्य, कोल्हापूर
१. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि नरविरांच्या रक्ताने पावन झालेला ऐतिहासिक विशाळगड किल्ला !
ऐतिहासिक विशाळगड किल्ल्याची उभारणी वर्ष १०५८ च्या सुमारास शिलाहार राजांच्या काळात झाली. प्रारंभीच्या काळात या किल्ल्याला ‘खेळणा’ या नावाने संबोधण्यात येत असे. वर्ष १६५९ मध्ये हा किल्ला ‘स्वराज्यात’ समाविष्ट केल्यानंतर छत्रपती शिवरायांनी या गडाचे ‘विशाळगड’ असे नामकरण केले. देवगिरीच्या पाडावानंतर संपूर्ण हिंदुस्थान पारतंत्र्यात असला, तरी सह्याद्रीच्या साहाय्याने काही छोटी-छोटी राज्ये त्यांचे अस्तित्व टिकवून होती, त्यातील एक म्हणजे महाराष्ट्रातील खेळणा उपाख्य विशाळगड ! वर्ष १४५३ मध्ये अल्लाउद्दीनशाह सानी या सुलतानच्या काळातील ही घटना विशाळगडच्या विशाल सामर्थ्याची जाणीव करून देते.
२. अल्लाउद्दीनशाह साना सुलतानने सरदार मलिक उत्तूजार याला कोकण आणि आजूबाजूचा प्रदेश कह्यात घेण्यासाठी पाठवणे !
अल्लाउद्दीनशाह साना या सुलतानने त्याच्या मलिक उत्तूजार या सरदाराला १० सहस्र सैन्य घेऊन कोकण आणि आजूबाजूचा प्रदेश कह्यात घेण्यासाठी पाठवले. मलिक उत्तूजार याने कोकणातील शिर्के यांच्यावर आक्रमण केले. शिर्के उत्तूजारला शरण आले. त्याने शिर्के यांना अट घातली की, तू जर तुझा धर्म सोडायला सिद्ध असशील, तर तुला जीवदान मिळेल, अन्यथा मी तुला ठार मारणार आहे. शिर्के धर्म सोडायला लगेच सिद्ध झाले. ते उत्तूजारला म्हणाले, ‘‘प्रथम आपण खेळणा गडावरील (विशाळगडावरील) शंकरराय मोरे यांना बाटवल्यानंतर आम्हाला त्याचा जाच होणार नाही.’’ मलिक उत्तूजारला हे लगेच पटले. त्याने लागलीच खेळणा गडावर स्वारी करण्याचे ठरवले. स्वत: शिर्के यांनीही त्यांची निवडक मंडळी घेऊन मलिक उत्तूजार याच्या समवेत खेळण्याकडे कूच केली.
३. विशाळगडावरील शंकरराय मोरे यांनी मलिक उत्तूजारचे सैनिक कापून काढणे !
विशाळगडाकडे जाणारी वाट सह्याद्रीचे भव्य पहाड आणि अरण्य यांच्यातून होती. भव्य पहाडांचे स्वरूप पाहून काही सैनिकांनी मलिक समवेत खेळण्याकडे (विशाळगडाकडे) येण्यास नकार दिला. याचा विचार न करता मलिक आणि शिर्के पुढे पुढे चालू लागले. शिर्के यांनी प्रारंभी २ दिवस त्यांना सोप्या वाटेने नेले; मात्र तिसर्या दिवशी भयंकर आणि अतिशय बिकट वाटेने नेले. घोर अरण्य आणि केसाच्या कुरळेपणासारख्या वाटा असल्याने मलिक उत्तूजारचे सैन्य थकून गेले. त्यांना धड चालणेही कठीण होऊन गेले. त्यांना तंबू ठोकण्यासाठीही मोकळी जागा मिळत नव्हती. पुष्कळ थकल्याने रात्री मलिकचे सैनिक विश्रांती घेत होते, तेव्हा शिर्के खेळणा गडावर शंकरराय मोरे यांच्याकडे गेले. त्यांनी मलिक उत्तूजार आणि त्याचे सर्व सैन्य घनदाट अरण्यात आणल्याचे सांगितले. त्यानंतर शंकरराय मोरे लगेच मोठे सैन्य घेऊन मलिक याच्याशी युद्ध करायला निघाले. शंकरराय यांनी त्यांच्या सैनिकांकडून मलिक उत्तूजार याच्या सैन्याला शेळ्या मेंढ्यांप्रमाणे कापून काढले. दिवस उगवायच्या आत ही कामगिरी करून शंकरराय मोरे त्यांच्या लोकांसह खेळणा किल्ल्यावर निघून गेले. (याच मलिक उत्तूजार याच्या सैन्यातील रेहान नावाच्या सरदारची कबर (रेहानबाबा दर्गा) आज विशाळगडावर असल्याचे जाणकारांचे मत आहे.)
४. बाजीप्रभु देशपांडे, फुलाजीप्रभु देशपांडे आणि मावळे यांच्या अद्वितीय पराक्रमाने घोडखिंड पावन होणे !
असे असले, तरी हा गड खर्या अर्थाने ओळखला जाऊ लागला, तो मराठ्यांच्या दैदीप्यमान इतिहासातील एका अचाट पराक्रमाने. सिद्दी जौहरच्या वेढ्यातून स्वत:ची सुखरूप सुटका करून घेऊन छत्रपती शिवराय याच गडावर पोचले होते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोचावेत यासाठी बाजीप्रभु देशपांडे, त्यांचे बंधू फुलाजीप्रभु देशपांडे आणि ३०० मावळे यांनी स्वत:च्या प्राणाची बाजी लावून शत्रूला घोडखिंडीत रोखून धरले होते. या अद्वितीय पराक्रमाने ही घोडखिंड पावन झाली. आज तीच घोडखिंड ‘पावनखिंड’ या नावाने ओळखली जाते.
५. विशाळगडावरील मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळे यांच्या दुरवस्थेकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !
अ. विशाळगडावर असणारी मंदिरे : श्री रामलिंग मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, श्री गणेश मंदिर, श्री अमृतेश्वर मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री विठ्ठलाईदेवी मंदिर, श्री वाघजाईदेवी मंदिर, श्री नृसिंह मंदिर, श्रीराम मंदिर यांसह अनेक छोटी छोटी मंदिरे गडावर आहेत. या मंदिरांची अवस्था अतिशय वाईट असून त्यांच्या जीर्णोद्धाराकडे सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. तेव्हा स्थानिक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांनी पुढाकार घेऊन तेथील काही मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्यामुळे श्री भगवंतेश्वर मंदिर आणि श्री विठ्ठल मंदिर यांसारखी काही मंदिरे चांगल्या स्थितीत आहेत.
आ. ऐतिहासिक स्थळे : राजवाडा, बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांची समाधीस्थळे, रणमंडल, शिवकालीन तोफ, मुंढा दरवाजा, अहिल्याबाई भोसले यांची समाधी, घोड्याच्या टापेचे पाणी आणि तोफेचे पाणी हा ऐतिहासिक ठेवा या किल्ल्याला लाभला आहे. या स्थळांचीही दुरवस्था झाली आहे. विशाळगडावर बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांची समाधीस्थळे आहेत; पण त्यांचा योग्य प्रकारे जीर्णोद्धार केला गेला नाही. तेथे केवळ एक छोटासा चबुतरा बांधण्यात आला आहे. सरकारने या ठिकाणी एक संग्रहालय बनवून या नरवीरांचा पराक्रम जगासमोर मांडायला हवा होता; पण या संदर्भात कोणतीही ठोस कृती झाली नाही. गडावर पडका राजवाडा आहे, त्याचाही जीर्णोद्धार केलेला नाही. त्या ठिकाणी बाहेरून येणारे पर्यटक पूर्वी शौचासाठी तेथे जायचे. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन या ठिकाणची स्वच्छता केली; पण अजूनही पुरातत्व विभागाने या राजवाड्याकडे लक्ष दिले नाही.
६. हिंदु जनजागृती समितीने गडावर लावलेल्या फलकाला धर्मांधांनी काळे फासणे !
विशाळगडाच्या संवर्धनासाठी हिंदुत्वनिष्ठांनी काही प्रयत्न करण्याचे ठरवले, तर पुरातत्व विभाग आणि वनविभाग यांचा त्याला विरोध असायचा. वर्ष २००८ मध्ये हिंदु जनजागृती समितीने हिंंदूंना गडावरील ऐतिहासिक वारसा लक्षात यावा, यासाठी एक फलक लावला होता. फलकाच्या उद्घाटनाच्या आदल्या रात्रीच काही धर्मांधांनी फलकाला काळे फासले ! प्रशासनाने त्या धर्मांधांना शोधून त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते; मात्र पोलीस प्रशासन आणि वनविभाग यांनी समितीच्या कार्यकर्त्यांनाच नाहक त्रास दिला. हेच पोलीस प्रशासन, वनविभाग आणि पुरातत्व विभाग गडावर अन् गडाच्या पायथ्याशी होणारे अतिक्रमण, तसेच अवैध व्यवसाय यांकडे मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत आहेत. गडावर होणारे अतिक्रमण आणि अवैध व्यवसाय या संदर्भात स्थानिक अन् हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी वेळोवेळी आवाज उठवला; पण प्रशासनाकडून अतिक्रमण आणि अवैध व्यवसाय यांविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
७. पुरातत्व विभागाला अंधारात ठेवून गजापूर-विशाळगड ग्रामपंचायतने अवैध बांधकामाला अनुमती देणे !
मी अतिक्रमणाविषयी पुरातत्व विभागाला पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात की, ‘संरक्षित क्षेत्रातील अतिक्रमण काढण्याचे दायित्व जरी पुरातत्व विभागाचे असले, तरी अतिक्रमण काढण्यासाठीची आवश्यक यंत्रणा या कार्यालयाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे हे कार्यालय कोणत्याही स्मारकावरील अतिक्रमण काढण्यासाठी त्या ठिकाणी असलेल्या स्थानिक प्रशासनावर अवलंबून असते.’ याच अनुषंगाने त्यांनी सरपंच गजापूर-विशाळगड (तालुका शाहूवाडी) यांना जा.क्र./तंत्र/६२/२०१६ २७/०१/२०१६ या दिवशी पाठवलेल्या पत्राची प्रत समवेत दिली आहे. यात ते म्हणतात की, ‘२२ जानेवारी २०१६ या दिवशी पुरातत्व विभागाने प्रत्यक्ष ‘विशाळगड किल्ला’ या स्मारकाची पहाणी केली असता किल्ल्याच्या क्षेत्रात अनेक ठिकाणी अवैध बांधकाम चालू असल्याचे निदर्शनास आले. त्याविषयी चौकशी केली असता, सरपंच, गट ग्रामपंचायत गजापूर-विशाळगड यांच्याकडून बांधकामास अनुमती देण्यात आल्याचे सांगण्यात आले. एकंदरित पुरातत्व विभागाला अंधारात ठेवून ग्रामपंचायत गजापूर-विशाळगड यांनी अवैध बांधकामाला अनुमती दिल्याचे लक्षात येते.
८. पुरातत्व विभागाने अवैध बांधकाम न पाडता केवळ आक्षेप घेणे !
याविषयी पुरातत्व विभागाने गट-ग्रामपंचायत गजापूर विशाळगड यांना कळवले की, संपूर्ण किल्ल्याच्या क्षेत्रात आपल्याकडून देण्यात आलेल्या अनुमतीवर आक्षेप घेण्यात येत आहे. सद्यःस्थितीत बांधकामाला अनुमती दिली असल्यास त्या तात्काळ रहित कराव्यात, तसेच गडावर केलेलेे बांधकाम काढून टाकण्याची कार्यवाही करण्यात यावी. पुरातत्व विभागाचे ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र असल्याविना कोणत्याही व्यक्तीला बांधकाम करण्यास अनुमती देण्यात येऊ नये. (पुरातत्व विभागाने दिलेली उत्तरे पहाता असे स्पष्ट होते की, पुरातत्व विभाग अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना उत्तर देतांना विशाळगडावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण झाल्याचे अमान्य करते. मला पाठवलेल्या उत्तरात मात्र ते गडावर अतिक्रमण झाल्याचे मान्य करतात, तसेच त्यांनी ते अतिक्रमण काढण्याविषयी ग्रामपंचायत गजापूर-विशाळगड यांना पत्र पाठवलेले असून त्याच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि शाहूवाडी तालुक्याचे तहसीलदार यांनाही पाठवल्याचे सांगतात.)
९. गडावरील अतिक्रमणाविषयी कोणत्याही शासकीय कार्यालयांकडे कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत !
अ. पुरातत्व विभागाने पाठवलेल्या पत्राच्या अनुषंगाने कोणती कारवाई केली ? याविषयी गजापूर-विशाळगड ग्रामपंचायत, शाहूवाडी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे माहिती मागवली. तेव्हा ग्रामपंचायत कार्यालयाने कळवल्याविषयी त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयाने कळवले की, सदरचा अर्ज शाहूवाडी कार्यालयाशी निगडित असल्याने त्यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. शाहूवाडी तहसीलदार कार्यालयाने कळवले की, सदर माहिती ही पुरातत्व विभागाशी निगडित असल्याने या कार्यालयाकडे उपलब्ध नाही.
आ. १९ सप्टेंबर २०१८ या दिवशी किल्ले विशाळगड येथे वर्ष १९७२ पासून बांधकामाच्या अनुमतीसाठी करण्यात आलेले अर्ज, त्यासमवेत जोडण्यात आलेली कागदपत्रे आणि त्याच्यावर करण्यात आलेली कारवाई यांविषयी माहिती मागितली. या उत्तरात त्यांनी आदम ईब्राहिम मुजावर आणि योगेश लक्ष्मण भोसले या दोघांना बांधकामाची अनुमती दिल्याचे सांगितले; मात्र अनुमतीच्या संदर्भात कोणतीही कागदपत्रे या कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्यक्षात वर्ष १९९८ नंतर गडावर अनेक ठिकाणी नवीन बांधकाम करण्यात आले असून अजूनही अनेक ठिकाणी बांधकाम चालू असल्याचे दिसते.
१०. वर्ष १९९७ ते २०१५ या कालावधीत मंदिरांची झालेली दुर्दशा
११. वर्ष १९९८ ते २०१५ च्या कालावधीत मशिदींचे वाढलेले बांधकाम
१२. वर्ष १९९८ ते २०१५ या कालावधीत गडावरील घरांचे वाढलेले क्षेत्रफळ
१३. मराठ्यांनी घडवलेला इतिहास विसरून हिंदूंनी मुसलमानांच्या दर्ग्यात माथा टेकवण्यासाठी गर्दी करणे
गडावर असलेल्या हिंंदूंच्या धार्मिक स्थळांच्या जीर्णोद्धाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. इतिहासकारांच्या मते, या ठिकाणी मलिक उतुजारच्या ‘मलिक रेहान’ या सरदाराच्या नावाने आर्.सी.सी. दर्गा असून तेथे प्रतिवर्षी उरूस भरवला जातो. येथे अनेक लोक दर्शनासाठी येऊन नवस बोलतात. या गडावर छत्रपती शिवराय सुखरूप पोेचावेत, यासाठी प्रत्यक्ष गडावर आणि गडाच्या पायथ्याशी ५ ते ६ किलोमीटरच्या परिसरात असंख्य मावळ्यांनी त्यांच्या रक्ताचे पाट वाहिले, तो इतिहास हिंदू विसरले असून ते रेहानबाबाच्या दर्ग्यात माथा टेकण्यात धन्यता मानतात, हे दुर्दैवच.
१४. ‘घोड्याच्या टापेचे पाणी’ या ऐतिहासिक स्थळाचे नाव पुसून तेथे ‘रेहानबाबाचे तीर्थ’ असे नाव देण्यात येणे
गडाच्या पश्चिमीकडे घोड्याच्या टापेच्या आकाराचे दगडावर चिन्ह उमटले आहे. त्याच्यामध्ये पाण्याचा झरा आहे. आतापर्यंत ते ‘घोड्याच्या टापेचे पाणी’ या नावानेच ओळखले जायचे; मात्र गेल्या काही वर्षांपासून धर्मांधांनी त्या ठिकाणची ओळख ‘रेहानबाबाचे तीर्थ’ या नावाने करण्यास प्रारंभ केला. त्याचा खोटा इतिहासही बनवला गेला. तेथे हिरवे झेंडे आणि मलिक रेहान दर्ग्याची छायाचित्रे लावण्यास प्रारंभ केला आहे. तेथे येणार्यांनाही ते रेहानबाबाचे तीर्थ असल्याचे आवर्जून सांगतात.
विशाळगडावर मंदिरांची संख्या न्यून होणे आणि मशिदींची संख्या वाढणेविशाळगड येथे वर्ष १९९७ पूर्वी असलेली मंदिरे आणि मशिदी अन् त्यांचे क्षेत्रफळ यांची आताच्या परिस्थितीशी तुलना केली असता त्या ठिकाणी वर्ष २०१५ नंतर मंदिरांची संख्या अल्प झाली असून मशिदींची संख्या आणि क्षेत्रफळ वाढल्याचे दिसते. |
विशाळगडावर अनेक ठिकाणी घरांची अनधिकृत बांधकामे होत असतांना पुरातत्व विभागाने त्याकडे डोळेझाक करणे !अ. गडावर असणारी हिंदूंच्या मंदिरांची संख्या अल्प होत असून मशिदींची संख्या वाढत आहे. घरांच्या बांधकामांचे क्षेत्रफळही अनेक ठिकाणी २ ते २.५ गुंठे वाढल्याचे दिसून येते; परंतु या संदर्भात प्रशासन मूग गिळून गप्प आहे. आ. गड पुरातत्व विभागाच्या कह्यात असतांनाही स्थानिक प्रशासनाने या गडावर लोकांना बेघर योजनेतून घरे बांधून दिली आहेत. बेघर म्हणून शासनाने घरेे संमत केली, त्या वेळी त्याचे क्षेत्रफळ २८८ स्के. फूट होते; पण त्या बेघर म्हणून दिलेल्या भूमीचे क्षेत्रफळही एका ठिकाणी वाढून २,०१३ स्के. फूट झाले आहे. एके ठिकाणी १,२०० स्के. फूट वाढल्याचे दिसते. असे अल्प-अधिक प्रमाणात सर्वच ठिकाणी वाढल्याचे दिसते. इ. इंदिरा आवास घरकुल योजनेच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांचीही अशीच स्थिती आहे. गडावर प्रतिदिन नवीन बांधकामे करण्यात येत आहेत. अशा स्थितीत पुरातत्व विभाग एक पत्र पाठवण्याविना काहीच कारवाई करत नाही. यातून पुरातत्व विभागाची या गडाविषयी असणारी उदासीनता स्पष्ट दिसून येते. |
गडावर होणार्या अतिक्रमणांकडे पुरातत्व विभाग, वनविभाग आणि स्थानिक प्रशासन यांनी दुर्लक्ष करणे !अ. ‘हिंदु विधीज्ञ परिषदेचे’ राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी १४ मे २०१८ या दिवशी विशाळगडावर होणार्या अतिक्रमणाविषयी साहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, पुणे यांच्याकडे माहिती अधिकाराच्या अंतर्गत अर्ज केला. यात त्यांनी ‘कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या अखत्यारीत असलेले किल्ले आणि त्यासमवेत असलेल्या किल्ल्यांवर अतिक्रमण झाले आहे का ?’, असे विचारले. तसेच अतिक्रमण झाले असल्यास ते हटवण्याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाशी केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती मागितली. आ. अधिवक्ता इचलकरंजीकर यांच्या अर्जाला १६ मे २०१८ या दिवशी साहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, पुणे यांच्याकडून उत्तर मिळाले. या उत्तरात ते म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात या विभागाच्या अखत्यारीत विशाळगड, भुदरगड आणि रांगणा हे किल्ले असून भुदरगड अन् रांगणा या किल्ल्यांवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण झालेले नाही. किल्ले विशाळगड येथे असलेले अतिक्रमण हे हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित होण्यापूर्वीचे आहे. येथील अतिक्रमण काढण्याविषयी या विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाशी कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही. इ. याच संदर्भात मी २२ मे २०१८ या दिवशी ‘साहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग’, पुणे यांच्याकडे माहिती अधिकाराच्या अंतर्गत अर्ज केला. यात विशाळगड किल्ला राज्य पुरातत्व विभागाने कह्यात घेतला, त्या आदेशाची प्रत आणि विशाळगड किल्ला ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्याच्या वेळीचा नकाशा त्या वेळीच्या बांधकामासहित मागवला. त्यानंतर त्याला ६ जुलै २०१८ या दिवशी पुरातत्व विभागाने उत्तर देतांना सांगितले, ‘विशाळगड किल्ला कोणत्या आदेशाने कह्यात घेतला आणि त्याची माहिती, तसेच गडाचा एक नकाशा पाठवला आहे.’ ज्यामधून काहीच स्पष्ट होते नव्हते. ई. त्यामुळे मी १९ सप्टेंबर २०१८ या दिवशी पुन्हा एकदा पुरातत्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून कह्यात घेतलेल्या सर्व वास्तूंची माहिती, शिक्षण विभागाची शासकीय अधिसूचना क्रमांक ए.एन्.एम्.१०६९/७४५७५/उ या अधिसूचनेची प्रत आणि विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याचे दायित्व असलेल्या शासकीय कार्यालयाची माहिती मागवली. त्यानंतर विभागाने ८ ऑक्टोबर २०१८ या दिवशी उत्तर दिले. त्यामध्ये त्यांनी, ‘विशाळगड कह्यात घेतलेल्या आदेशाविषयी शासनाची अधिसूचना क्र. ए.एन्.एम्.१०६९/७४५७५/उ, १३ जून १९७४ अन्वये विशाळगड किल्ल्यावरील बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाध्या अन् वृंदावने ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आल्याविषयीची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झालेली आहे. तद्नंतर व्यापक दृष्टीकोनातून विशाळगड किल्ल्याशी निगडित संपूर्ण क्षेत्र शासन निर्णय क्रमांक ए.एन्.एम्. १०९६/प्र.क्र. २१६/९६/सां.का.३, ८ जानेवारी १९९७ अन्वये ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे विशाळगडावरील सर्व प्राचीन ऐतिहासिक वास्तू शासनाच्या अखत्यारीत येत आहेत. त्यामुळे अभिलेखावर स्वतंत्र सूची नाही’, असे उत्तर दिले. (यावरून असे लक्षात येते, विशाळगड कह्यात घेण्यासंदर्भात १३ जून १९७४ या दिवशीच्या आदेशानुसार बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांची समाधीस्थळे आणि वृंदावने इतकाच भाग कह्यात घेण्यात आला होता. त्याच्यानंतर ८ जानेवारी १९९७ या दिवशी दुसरा आदेश काढून संपूर्ण विशाळगडच पुरातत्व विभागाने त्यांच्या कह्यात घेतला आहे.) |
विशाळगडावरील इस्लामीकरण रोखण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष आणि धर्माभिमानी हिंदू यांनी ‘जनआंदोलन’ उभे करणे आवश्यक !विशाळगडाचे पावित्र्य राखणे, सत्य इतिहास समाजमनासमोर आणणे, गडावर होणारे अतिक्रमण थांबवणे आणि गडाचे ‘इस्लामीकरण’ थांबवून गड खर्या अर्थाने पुन्हा एकदा स्वराज्यात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदुत्वनिष्ठांना कंबर कसावी लागणार आहे. पुरातत्व विभागाने गडावर असणार्या सर्व धार्मिक आणि ऐतिहासिक वास्तूंच्या ठिकाणी फलक उभे करून त्या सर्वांची माहिती द्यावी, एक मोठे वस्तू संग्रहालय उभे करून त्याच्यामध्ये हिंदूंचा गौरवशाली इतिहास मांडावा, ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातूनही हा इतिहास सांगितला जावा आणि सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार व्हावा यांसाठी सर्व हिंदुत्वनिष्ठ पक्ष, हिंदुत्वनिष्ठ संघटना अन् धर्माभिमानी हिंदू यांनी एकत्र येऊन मोठे ‘जनआंदोलन’ उभे करणे आवश्यक आहे. यासाठी हिंदूंना न्यायालयीन लढ्यासह अन्य आंदोलने करण्याची सिद्धता करावी लागेल. यासाठी सर्व हिंदूंना सद्बुद्धी, सामर्थ्य आणि शक्ती द्यावी, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’ |
– श्री. बाबासाहेब भोपळे, हिंदु जनजागृती समिती अन् ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’चे सदस्य, कोल्हापूर. (५.९.२०२०)