राज्यात कडक दळणवळण बंदी करण्यास भाग पाडू नये ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुंबई – मागील वर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार चालू केले. त्यानंतर ४ मास सर्वांनी एकजुटीने कोरोनाचा संसर्ग रोखला; पण आता ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने आणि नियम न पाळल्याने संसर्ग वेगाने वाढत आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे. हॉटेल आणि उपाहारगृहे यांनी नियमांचे पालन करावे. राज्यात कडक दळणवळण बंदी करण्यास भाग पाडू नये, अशी चेतावणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. १४ मार्च या दिवशी उद्धव ठाकरे यांनी रेस्टॉरंट, शॉपिंग सेंटर संघटना यांच्या प्रतिनिधींशी ऑनलाईन प्रणालीद्वारे संवाद साधला. या वेळी त्यांनी वरील वक्तव्य केले.

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले,

१. मागील ४ मासांत सर्व काही व्यवस्थित चालले होते. आपल्याच राज्यात नव्हे, तर अगदी युरोपमध्येही ‘जणू काही कोरोना गेला’, असे समजून सर्व व्यवहार मोकळेपणाने चालू झाले होते; मात्र अचानक सर्वत्र संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. युरोपसारखी परिस्थिती होऊ द्यायची नसेल, तर काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळावे लागतील.

२. पुढच्या काळातही आपल्याला कोरोनासमवेतच जगायचे आहे. त्यानुरूप जीवनपद्धत सिद्ध करावी लागेल. बंदी आणि स्वयंशिस्त यांत भेद असून सर्वांनी याचे भान ठेवावे.

३. मागील वर्षी विशेषत्वाने झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणात संसर्ग दिसू लागला होता; मात्र या वेळी तो इमारती, बंगले, सोसायटी यांमध्ये दिसत आहे. याचे कारण म्हणजे मागील काही दिवसांपासून या वर्गाचे एकमेकांना भेटणे, हॉटेल-मॉलमध्ये जाणे चालू झाले आहे. त्यामुळे परिवारातील सर्व सदस्यांत एकदम प्रसार होत आहे.

४. मागील आठवड्यात केंद्रीय पथक मुंबईत आले असता एका हॉटेलमध्ये कोणत्याही कर्मचार्‍यांनी मास्क घातलेला नव्हता. सुरक्षित अंतर न पाळता गर्दी झालेली त्यांना दिसून आली. राज्यभरात आता काही हॉटेल्स, मॉल्स, उपाहारगृहे यांमध्ये नियमांची पायमल्ली होत असल्याचे प्रशासनाला दिसत आहे.

५. अजूनही परिस्थिती आपल्या हातात आहे. ‘सर्व जण नियम धुडकावत आहेत’, असे नाही; पण नियम न पाळणार्‍यांमुळे धोका वाढत आहे. दळणवळण बंदी करणे आम्हालासुद्धा आवडणार नाही. सर्वांनी सहकार्य केले, तर संसर्ग रोखता येईल. त्यामुळे दळणवळण बंदीसारखे कडक निर्बंध लावण्यास भाग पाडू नका.