परिस्थिती हाताबाहेर गेली, तर महाराष्ट्र सरकार किंवा शिवसेना यांना उत्तरदायी धरू नका ! – संजय राऊत

सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र-बेळगाव बसवाहतूक बंद !

मुंबई – बेळगावात मराठी लोकांवर जो अत्याचार होत आहे, त्याची नोंद कुणी घेत नसेल, तर महाराष्ट्र सरकारला सर्व शक्तीनिशी बेळगावात उतरावे लागेल. जर तेथील परिस्थिती हाताबाहेर गेली, तर महाराष्ट्र सरकार किंवा शिवसेना यांना उत्तरदायी धरू नका. डोकी फुटली, तर देहलीत रडत जाऊ नका, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना दिली. शिवसेनेच्या बेळगाव जिल्हाप्रमुखांच्या गाडीवर पोलीस बंदोबस्त असतांना कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमण केले. तसेच शिवसेनेच्या रुग्णवाहिनीवरही आक्रमण केले. या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर खासदार राऊत यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

खासदार राऊत पुढे म्हणाले की, 

१. बेळगावात परिस्थिती चिघळत असेल, तर त्यासाठी केंद्र सरकार उत्तरदायी आहे. केंद्र सरकारने आता हस्तक्षेप करावा. मी काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवेदने पाहिली आहेत. बेळगावला महाराष्ट्रात आणायचे, ही त्यांची भूमिका आहे; पण सर्वांत आधी तिकडच्या मराठी नागरिकांना संरक्षण देण्याची आवश्यकता आहे.

२. बेळगावात चालू असलेली दडपशाही ही काही एका राजकीय पक्षाचा किंवा सरकारचा विषय नाही. राज्यातून एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ तात्काळ बेळगावला पाठवायला हवे. मी स्वत: बेळगावला जायचा प्रयत्न करत आहे. तेथील असंख्य लोकांचे मला दूरभाष येत आहेत. बेळगाव हा या देशाचा भाग आहे. आम्ही मराठी माणसे तिकडे जायचे म्हटले की, आम्हाला बंदुका दाखवतात. आमच्याकडे बंदुका नाहीत का ?

अन्य घडामोडी

१. काही अज्ञातांकडून कोल्हापूर बसस्थानक परिसरात महाराष्ट्र एस्.टी. बसवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर सुरक्षितता म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांकडून एस्.टी.ची वाहतूक बंद करण्यात आली.

२. पुणे-बेंगळुरू महामार्गावर असणार्‍या उपाहारगृहाच्या मराठी भाषेतील फलकांना काही कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले, तसेच उपाहारगृह मालकांना मराठी फलक न वापरण्याची चेतावणी दिली.