‘१७.६.२०२० या दिवशी सकाळी ९.३० वाजता मी नामजप करण्यास आरंभ केला. ९.३५ वाजता मला माझ्या हृदयस्थानी ज्योत जाणवली. प्रथमच मला अशी ज्योत दिसली. तेव्हा ही ज्योत ‘आत्मज्योतच आहे’, असे मला जाणवले. हे अनुभवत असतांना काही क्षण ‘माझे आज्ञाचक्र जागृत झाले असून अनाहतचक्र तेजतत्त्वाने भारित झाले आहे’, असे मला जाणवत होते. मी नमस्कारासाठी हात जोडल्यानंतर माझे हात अनाहत चक्राजवळ गेल्यावर ‘तेजतत्त्वात आणखी भर पडत आहे’, असे मला जाणवले. माझ्या देहावरील आवरण काढतांना माझ्या बोटांमधून नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात ऊर्जा प्रक्षेपित होत असल्याचे माझ्या लक्षात आले.’
– श्री. मुकुंद ओझरकर, नाशिक (१७.६.२०२०)
श्री. मुकुंद ओझरकर यांना भावस्थितीविषयी आलेल्या अनुभूती
१. भावस्थिती
‘यापूर्वी मी भाववृद्धी होण्यासाठी ‘प.पू. गुरुदेवांच्या सान्निध्यातील आठवणी, साधनेविषयी केलेल्या कविता, आलेल्या अनुभूती’, यांचे वाचन करत असे. ते वाचत असतांना माझी भावजागृती होऊन डोळ्यांत भावाश्रू येणे आणि शरिरावर रोमांच येणे, अशा अनुभूती मला येत होत्या.
३१.३.२०२० या दिवसापर्यंत सेवा करतांना संगणकावर श्रीकृष्णाची सुंदर भजने लावून माझी अत्यंत तन्मयतेने सेवा व्हायची. मी या भावस्थितीत असतांना बर्याच वेळा ती भजने बंद व्हायची; पण मला त्याचे भान नसायचे.
२. यापूर्वी ज्या गोष्टींतून भावजागृती होऊन आनंद मिळत होता, त्यातून आता आनंद न मिळणे
३१.३.२०२० या दिवशी मी सेवा करतांना संगणकावर भजन लावले आणि नंतर एका सेकंदात ‘भजन ऐकू नये’, असे मला वाटले. मला पूर्वी ज्यातून आनंद मिळायचा, तसा आनंद मिळणे मला बंद झाले. ‘प.पू. गुरुदेवांच्या सान्निध्यातील आठवणी, साधनेविषयी केलेल्या कविता, आलेल्या अनुभूती’, यांचे वाचन करतांना भावजागृती होत नाही’, हे माझ्या लक्षात आले. त्या वेळी मी ‘स्तंभित झालो आहे’, असे मला वाटले. यापूर्वी असे कधीही झाले नव्हते.
३. ‘भावातीत’ स्थितीची आठवण होणे
‘माझ्यात भाव नाही कि काय ?’, असा संभ्रम निर्माण झाला. मला ‘भावाचे प्रकार आणि जागृती’ या ग्रंथाची आठवण झाली. त्यात सांगितल्याप्रमाणे ‘ही स्थिती भावातीत होणे’ या स्थितीप्रमाणे आहे’, असे मला वाटले. ग्रंथात सांगितल्याप्रमाणे ‘डोळ्यांसमोर काजवा चमकल्याप्रमाणे प्रकाश दिसणे’, अशी अनुभूती मला अनेक दिवसांपासून येत आहे.
४. प.पू. गुरुदेवांनी प्रार्थनेचे महत्त्व सांगितल्यावर स्वतःत पालट होणे
वर्ष २००२ मध्ये प.पू. गुरुदेव नाशिक येथे आल्यावर मला उद्देशून म्हणाले होते, ‘‘प्रार्थनेत शब्दांना पुष्कळ महत्त्व आहे.’’ त्या वेळी माझ्या मनात ‘भाव असेल, तर देव देणारच आहे’, असा विचार होता. परात्पर गुरुदेवांनी प्रार्थनेचे महत्त्व सांगितल्यावर माझ्यात पुष्कळ पालट झाला.’
– श्री. मुकुंद ओझरकर, नाशिक (१६.४.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |