पुण्यात ‘रॅपिड अँक्शन फोर्स’ला पाचारण
मुंबई – कोरोनाच्या कारणावरून १४ मार्च या दिवशी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एम्.पी.एस्.सी.) परीक्षा रहित करण्यात आल्याने राज्यात पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, अमरावती या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून मोठा निषेध केला. कोरोनाच्या काळात निवडणुका झाल्या, लग्न सोहळे झाले, तर परीक्षा होऊ शकत नाही का, अशी विद्यार्थ्यांची भूमिका होती. विद्यार्थ्यांनी सर्व नियम पाळले असते, तसेच परीक्षा केंद्राची जागाही पालटू शकते. काही लांबगावचे विद्यार्थी केंद्राच्या गावात पोचलेही आहेत, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. आतापर्यंत ४ वेळा परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा रोष आहे. पुण्यात नवी पेठमध्ये संतप्त झालेले विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. गर्दी वाढत चालल्यामुळे येथे धडक कृती दलाला (रॅपिड अॅक्शन फोर्स) पाचारण करण्यात आले.
मदत आणि पुनर्वसन खात्याकडून सूचना आल्याचे आयोगाचे अधिकारी सांगत होते. तर शिक्षण खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी असे नसल्याचे सांगितले. या संदर्भात ‘मुख्यमंत्र्यांना विनंती करू’, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या ८ दिवसांतच ही परीक्षा होणार असल्याचे ११ मार्च या दिवशी सांगितले.
ठळक प्रतिक्रिया
- भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनात ‘जोपर्यंत सरकार परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय रहित करत नाही, तोपर्यंत येथून हलणार नाही’, अशी चेतावणी दिली.
- ‘अशामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होईल’, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
- ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याशी हा खेळ आहे’, असे भाजपचे नेते आशिष शेलार म्हणाले.
- ‘हा चुकीचा निर्णय आहे’, असे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे-पालवे म्हणाल्या.
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘यातून निश्चित तोडगा काढून लवकरच परीक्षा होईल’, असे सांगितले.