रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात केलेल्या अग्निहोत्राच्या संदर्भात केलेले संशोधन !

अग्निहोत्राविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

  • ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

  • १२ मार्च २०२१ या दिवशी ‘विश्‍व अग्निहोत्रदिन’ आहे. यानिमित्ताने…

‘परात्पर गुरु डॉ. आठवले ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेचे महान समष्टी कार्य करत आहेत. या कार्यात अडथळे आणण्यासाठी मोठ्या वाईट शक्ती सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांवर सतत आक्रमण करतात. गत २० वर्षांपासून चालू असलेला हा ‘देवासुर लढा’ आता अंतिम टप्प्यात पोचला आहे. नोव्हेंबर २०१९ पासून सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात या सूक्ष्मयुद्धाचे पडसाद उमटण्यास आरंभ झाले. वाईट शक्तींच्या सूक्ष्मातील आक्रमणांमुळे ध्यानमंदिरावर त्रासदायक शक्तींचे आवरण आल्याचे लक्षात आले. आश्रमातील ध्यानमंदिर हे चैतन्याचे स्रोत आहे. ध्यानमंदिरावरील त्रासदायक शक्तींचे आवरण नष्ट होण्यासाठी महर्षि, तसेच काही संत वेळोवेळी नामजपादी उपाय करण्यास सांगतात.

जुलै २०२० मध्ये सनातनच्या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ध्यानमंदिरात प्रतिदिन सकाळी आणि सायंकाळी अग्निहोत्र करण्यास सांगितले. त्यानुसार जुलै ते सप्टेंबर २०२० पर्यंत ध्यानमंदिरात प्रतिदिन सकाळी आणि सायंकाळी अग्निहोत्र करण्यात आले. ध्यानमंदिरात केलेल्या अग्निहोत्राच्या संदर्भात विज्ञानाद्वारे संशोधन करण्यासाठी २२.७.२०२० या दिवशी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

सनातनच्या ६२ टक्के पातळीच्या साधिकेने ध्यानमंदिरात प्रतिदिन सकाळी आणि सायंकाळी अग्निहोत्र करण्यास आरंभ केले. २२.७.२०२० या दिवशी ध्यानमंदिरात अग्निहोत्र करण्यापूर्वी आणि केल्यानंतर अग्निहोत्र करणारी साधिका, तसेच अग्निहोत्र-पात्र आणि त्यातून निघणारा धूर यांची निरीक्षणे करण्यात आली.

१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्‍लेषण – आश्रमातील ध्यानमंदिरात अग्निहोत्र केल्यावर अग्निहोत्र करणारी साधिका, तसेच अग्निहोत्र-पात्र आणि त्यातून निघणारा धूर यांच्यावर झालेले परिणाम

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१. अग्निहोत्र केल्यानंतर साधिकेतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन तिच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली.

२. अग्निहोत्रानंतर अग्निहोत्र-पात्र आणि त्यातून निघणारा धूर यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.

३. अग्निहोत्र-पात्रातील अग्नी शांत झाल्यानंतर (विझल्यानंतर) अग्निहोत्र-पात्र आणि त्यातून निघणारा धूर यांच्यातील सकारात्मक ऊर्जा न्यून होऊन त्यांच्यामध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.

४. अग्निहोत्र-पात्रातील विभूतीमध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आढळली.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण 

सौ. मधुरा कर्वे

२ अ. अग्निहोत्र केल्यानंतर साधिकेतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन तिच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणे : अग्निहोत्र हे यज्ञाचे सर्वांत पहिले, सर्वांगपूर्ण आणि आचरण्यास सोपे अन् सहज रूप आहे. अग्निहोत्रामुळे वातावरणातील रज-तम कणांचे विघटन होऊन वातावरण शुद्ध आणि चैतन्यमय बनते. तसेच अग्निहोत्र करणार्‍या व्यक्तीभोवती संरक्षक-कवच निर्माण होते. सनातनच्या ६२ टक्के पातळीच्या साधिकेने सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात अत्यंत भावपूर्णरित्या अग्निहोत्र केले. त्यातून प्रक्षेपित झालेले चैतन्य तिने ग्रहण केल्याने तिच्या भोवतीचे त्रासदायक स्पंदनांचे आवरण नष्ट होऊन तिच्याभोवती संरक्षककवच निर्माण झाले.

२ आ. अग्निहोत्र केल्यानंतर अग्निहोत्र-पात्र आणि त्यातून निघणारा धूर यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे : अग्निहोत्र-पात्रात गोमयाच्या (गायीच्या शेणाच्या) गोवर्‍याचे लहान तुकडे ठेवून त्यावर गायीचे थोडे तूप घालून अग्नी प्रज्वलित केला जातो. त्यामध्ये मंत्रपूर्वक तूप-मिश्रित चिमुटभर अखंड तांदुळाची ३ वेळा आहुती दिली जाते. या सात्त्विक घटकांमध्ये देवतांचे तत्त्व ग्रहण करून प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. अग्निहोत्रामुळे देवतांचे तत्त्व आकृष्ट होऊन ते वातावरणात प्रक्षेपित होते. त्यामुळे वातावरण शुद्ध आणि पवित्र बनते. ध्यानमंदिरात केलेल्या अग्निहोत्रातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा सकारात्मक परिणाम अग्निहोत्र-पात्र आणि त्यातून निघणारा धूर यांच्यावर होऊन तेही चैतन्याने भारीत झाले.

२ इ. अग्निहोत्र-पात्रातील अग्नी शांत झाल्यानंतर (विझल्यानंतर) अग्निहोत्र-पात्र आणि त्यातून निघणारा धूर यांच्यातील सकारात्मक ऊर्जा न्यून होऊन त्यांच्यामध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याचे कारण : सर्वसाधारणपणे अग्निहोत्राचा परिणाम पुढे काही घंटे टिकून रहातो. आश्रमातील ध्यानमंदिरात अग्निहोत्र केल्यानंतर (म्हणजे सुमारे १० मिनिटांनी) चाचणी केली असता, अग्निहोत्र-पात्र आणि त्यातून निघणारा धूर यांच्यावर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यानंतर सुमारे १५-२० मिनिटांनी (अग्निहोत्र-पात्रातील अग्नी शांत झाल्यानंतर) (विझल्यानंतर) अग्निहोत्र-पात्र आणि त्यातून निघणारा धूर यांची पुन्हा चाचणी केली, तेव्हा मात्र त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून होऊन त्यांच्यामध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे दिसून आले. याचे कारण हे की, ध्यानमंदिरावर आलेले त्रासदायक शक्तींचे आवरण पुष्कळ दाट असून त्याचा प्रभावही पुष्कळ अधिक आहे. त्यामुळे अग्निहोत्राचा परिणाम केवळ १०-१५ मिनिटेच टिकला आणि त्यानंतर ध्यानमंदिरावरील त्रासदायक स्पंदनांच्या प्रभावामुळे अग्निहोत्र-पात्र आणि त्यातून निघणारा धूर यांच्यातील सकारात्मक स्पंदने न्यून होऊन ते नकारात्मक स्पंदनांनी भारित झाले. (या कालावधीत अन्य दिवशी केलेल्या चाचण्यांतूनही हाच भाग दिसून आला.)

२ ई. अग्निहोत्र-पात्रातील विभूतीमध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आढळण्याचे कारण : सर्वसाधारणपणे अग्निहोत्र केल्यानंतर त्यातील विभूती (राख) चैतन्याने भारित होत असल्याने तिचा उपयोग चैतन्य मिळावे म्हणून कपाळावर लावणे, वास्तूशुद्धीसाठी विभूती घरात फुंकरणे, झाडांना विभूती-मिश्रित पाणी घालणे इत्यादी विविध प्रकारे  केला जातो. विभूतीवर त्रासदायक स्पंदनांचे आवरण येऊ नये, म्हणून ती डबीत भरून सात्त्विक ठिकाणी ठेवतात. अग्निहोत्र केल्यानंतर साधारण २ दिवसांतच विभूतीचा उपयोग करून ती संपवणे श्रेयस्कर आहे. आश्रमातील ध्यानमंदिरात केलेल्या अग्निहोत्रानंतर सुमारे ३ घंट्यांनी अग्निहोत्र-पात्रात साठलेल्या विभूतीची चाचणी केली असता, तिच्यामध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आढळली. यातून ध्यानमंदिरावर आलेले त्रासदायक शक्तींचे आवरण केवढे दाट असून त्याचा प्रभावसुद्धा किती प्रचंड आहे, हे लक्षात येते. (या कालावधीत अन्य दिवशी केलेल्या चाचण्यांतूनही हाच भाग दिसून आला.)

थोडक्यात आश्रमातील ध्यानमंदिर चैतन्याचे स्रोत आहे. मोठ्या वाईट शक्तींनी ध्यानमंदिरावर मोठ्या प्रमाणात त्रासदायक स्पंदनांचे आवरण आणून चैतन्याचा स्रोत अडवण्याचा प्रयत्न केला. ध्यानमंदिरावर आलेले त्रासदायक शक्तींचे आवरण नष्ट होण्यासाठी महर्षि आणि काही संत वेळोवेळी उपाय सांगतात. त्यानुसार सर्व उपाय भावपूर्ण करण्यात येतात. सनातनच्या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितल्यानुसार ध्यानमंदिरात केलेल्या अग्निहोत्राच्या संदर्भात केलेल्या वैज्ञानिक संशोधनामुळे ‘देवासुर लढा कसा असतो ? त्याची तीव्रता कशी असते ?’, याची वाचकांना काही अंशी तरी कल्पना यावी, यासाठी हा लेखप्रपंच !’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१२.१.२०२१)

ई-मेल : [email protected]

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  •  सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.