सातारा, १० मार्च (वार्ता.) – येथील महागावस्थित मातोश्री वृद्धाश्रमात १९ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले. संबंधितांवर तात्काळ उपचार चालू करण्यात आले असून एका वृद्धाला सातारा येथील जम्बो कोविड रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तसेच महागाव ग्रामपंचायतीला आश्रम सँनिटाईझ करायला सांगितले आहे, अशी माहिती चिंचणेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्रीकांत कारखानीस यांनी दिली.
सांगली येथील एका संस्थेने पुढाकार घेऊन महागाव या ठिकाणी मातोश्री वृद्धाश्रम चालू केला. सध्या या आश्रमात २८ वृद्ध वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वी या आश्रमातील ४ वृद्ध नागरिक कोरोनाबाधित झाले होते. त्यांच्यावर चिंचणेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथकाने उपचार केले. ते पूर्ण बरे झाले आहेत; मात्र त्यांच्या संपर्कात आलेल्या १९ जणांमध्ये कोरोनाची लक्षणे जाणवल्यामुळे त्यांची पडताळणी करण्यात आली. तेव्हा ते कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर तात्काळ उपचार चालू करण्यात आले असून एका वृद्धाला सातारा येथील जम्बो कोविड रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.