उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. सोहम बडगुजर हा आहे !
(वर्ष २०१८ मध्ये सोहमची पातळी ६३ टक्के घोषित करण्यात आली होती.’ – संकलक)
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या दळणवळण बंदीच्या कालावधीमध्ये मी आणि हर्षद खानविलकर जळगाव येथील सोहमच्या घरी त्यांच्या वरच्या मजल्यावरील खोलीमध्ये वास्तव्यासाठी होतो. त्या वेळी आम्हाला सोहमची आजी आणि आई चहा, न्याहारी, खाऊ किंवा अन्य लागेल ते साहाय्य करायच्या; पण यात सोहमचा अधिक पुढाकार असायचा. त्या वेळी ‘हे सर्व नियोजन सोहमने केले आहे का ?’, असा प्रश्न आम्हाला पडायचा. ‘तोच आम्हाला ‘हवे-नको’ ते पहात आहे’, असे वाटायचे. पहिल्या दिवसापासूनच देवाने सोहमचे व्यवस्थापनातील गुण मला शिकवण्यास आरंभ केले. त्याला मी गमतीत म्हणायचोसुद्धा ‘मी रामनाथी आश्रमात गेल्यावर तुला याच सेवेमध्ये घेण्यास सांगतो.’ गुरुदेवांनी मला सोहमच्या सहवासात ठेवून त्याच्यातील गुण शिकण्याची संधी दिली, त्याविषयी मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.
१. इतरांचा विचार करणे
सोहम आम्हाला ‘काय हवे-नको’, ते अगदी बारकाईने पहायचा. आम्ही येण्याआधी आमची व्यवस्था करण्यात सोहमने त्याच्या बाबांना साहाय्य केले होते. भोजनाचा डबा आणण्यासाठी आम्ही सेवाकेंद्रात जायचो. आम्ही घरी आल्यावर तो लगेचच ‘सॅनिटायझर’ घेऊन बाहेर यायचा आणि आमचे दोन्ही हात अन् पाय यांवर ‘सॅनिटायझर’चा फवारा मारायचा. तेव्हा आम्हाला त्याचा ‘इतरांचा विचार करणे’ हा गुण शिकायला मिळायचा. निवासाला रहात असतांना ‘एखाद्या वडीलधार्या व्यक्तीचा आधार वाटतो’, तसा आम्हाला सोहमचा आधार वाटायचा. ‘त्याच्यात असलेला भाव, त्याचे व्यवस्थापकीय गुण आणि सेवेतील तत्परता यांमुळे मला असे जाणवत असावे’, असे मला वाटले.
२. प्रेमभाव
२ अ. साधकांच्या खाण्यापिण्याची काळजी घेणे : आमच्यासाठी प्रतिदिन सकाळी सोहम न्याहारी घेऊन यायचा. तेव्हा तो ती देत असतांना आमचा कृतज्ञताभाव पुष्कळ जागृत व्हायचा. नंतर काही वेळाने तो चहा घेऊन आल्यावर थोडा वेळ बोलायचा आणि ‘मला अधिक वेळ थांबायचे नाही’, असे सांगितले आहे’, असे सांगून थोडी विचारपूस करून लगेच खाली जायचा. ‘आमच्या खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये सोहम जातीने लक्ष घालून आमची काळजी घेत होता’, हे लक्षात येऊन मला त्याच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली.
२ आ. साधकांनी खाऊ खाल्ल्यानंतर स्वतः खाणे : आईने काही खाऊ बनवल्यानंतर अन्य मुले तो आधी घेतात. हट्ट करतात; पण सोहम आधी आम्हाला खाऊ आणून द्यायचा. आम्ही खाल्ल्यावर ‘आम्हाला आवडले’, याचा तो आनंद घ्यायचा. मग खाली जाऊन तो ते पदार्थ आई बनवीपर्यंत थांबून राहून मग स्वतः घ्यायचा. तो इतरांचा विचार सतत करायचा. ‘इतरांना आनंद द्यायला त्याला पुष्कळ आवडते’, हे यातून लक्षात आले.
३. मोठ्यांनाही लाजवेल, अशा कृती करणे
सोहम आम्हाला काही द्यायला आल्यावर ‘आम्हाला काही हवे आहे का ? काही न्यून पडत नाही ना ?’, असे विचार त्याच्या मनात सतत असल्याची स्पंदने त्याच्याकडून यायची आणि आम्हाला त्याच्याविषयी कृतज्ञता वाटायची. कदाचित् त्यालाही त्याचे हे वागणे लक्षात येत नसेल; पण तो दैवी बालक असल्याने त्याच्याकडून मोठ्यांनाही लाजवेल, अशा कृती घडायच्या. आम्ही हाक मारल्यावर तोे लगेच ‘ओ’ देऊन आई, बाबा आणि आजी यांचे साहाय्य घेऊन आम्हाला साहाय्य करायचा.
४. व्यष्टी साधनेचे गांभीर्य असणे
तो नियमित नामजप आणि मंत्रजप करतो आणि व्यष्टी साधनेचा आढावा देतो. आम्हाला कधी काही देण्यासाठी किंवा सांगण्यासाठी आल्यावर त्याला नामजप, मंत्रजप किंवा आढाव्याची वेळ झाल्याचे लक्षात आल्यावर तो त्याला प्राधान्य देतो आणि तात्काळ ते करतो. त्याचा ‘गुरूंप्रती पुष्कळ भाव आहे’, असे लक्षात येते.
५. धर्माचरणी आणि देशाभिमानी
सोहमला राष्ट्र आणि धर्म यांची आवड आहे. तो तानाजी मालुसरे यांच्याविषयीचा पोवाडा पुष्कळ छान आणि अभिमानाने गातो. त्याच्यात धर्माभिमान आहे. तो घरातून कुठे बाहेर जायचे नसतांनाही प्रतिदिन तिलक धारण करतो. राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघातांविषयी तो संवेदनशील असतो. त्याच्या मनात राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघातांविषयी चीड असते.
त्याने एकदा ‘गदर’ या चित्रपटाच्या आरंभीचा काही भाग पाहिला होता. त्याविषयी सांगत असतांना त्याला भारतियांविषयी चिंता वाटत होती. त्या चित्रपटात फाळणीच्या वेळचे काही प्रसंग दाखवण्यात आले होते. त्या चित्रपटातील ‘आपल्या कितीतरी लोकांवर अत्याचार करून त्यांना भारतात पाठवले. रेल्वेमध्ये जागा नव्हती, तरी त्यांना तसेच बळजोरीने पाठवले’, या प्रसंगाविषयी तो मला पुष्कळ गांभीर्याने सांगत होता. यातून त्याला इतक्या लहान वयात असलेली राष्ट्र आणि धर्म यांविषयी आवड शिकण्यास मिळली. ‘सोहमसाखी देशाभिमानी आणि धर्माचरणी मुलेच उद्याचे हिंंदु राष्ट्र चालवणार आहेत’, हेच जणू श्रीगुरु मला त्याच्या माध्यमातून शिकवत होते. त्यामुळे मला गुरुदेव आणि सोहम यांच्याविषयी कृतज्ञता वाटायची.
६. सेवेची तळमळ
तो कुठे सेवेसाठी गेल्यावर खेळत बसत नाही, तर बाबा करत असलेल्या सेवेमध्ये लक्ष देतो आणि त्यात त्याला काही जमले, तर करण्याचा प्रयत्न करतो किंवा ते ऐकतो किंवा निरीक्षण करतो. तो वेळ वाया घालवत नाही. सेवेसाठी त्याची धडपड चालू असते. त्याला ‘व्यवस्थापन म्हणजे काय ?’, हे ठाऊक नाही; पण त्याच्या वागण्या-बोलण्यातून ‘त्याची सेवेची तळमळ आणि इतरांचा विचार करणे’, हे गुण पाहून ‘देवानेच त्याला व्यवस्थापनाचा अन् नेतृत्वाचा गुण दिला आहे’, हे गुरुदेवांनी मला शिकवले.
७. प्रगल्भता
त्याच्यामध्ये इतक्या लहान वयात असलेली प्रगल्भता हे त्याच्या दैवीपणाचे लक्षण आहे. आता दळणवळण बंदी आहे; म्हणून तो आई-बाबांसह रहात आहे; पण अन्य वेळी त्याची आई देवद आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करते आणि बाबा नांदेड येथे पूर्णवेळ धर्मप्रसारासाठी असतात. सोहम एकटाच आजीसह रहातो. मी लहान असतांना एकदा माझ्या आई-बाबांना सोडून शाळेत जातांनाही मला त्यांची आठवण येऊन मी रडलो होतो; पण सोहम हा खरंच दैवी आहे. इतक्या लहान वयामध्ये त्याच्यामध्ये कमालीची प्रगल्भता आली आहे. ‘आई-बाबा सेवेसाठी आहेत. ‘माझ्यासमवेत गुरुदेव आहेत’, अशी श्रद्धा ठेवून सर्वांसमोरच आदर्श निर्माण करण्यार्या सोहम समवेत राहून शिकण्याची संधी गुरुदेवांनीच मला दिली.
८. सर्वांवर प्रेम करणारा आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा सोहम !
तो जळगावच्या सर्व साधकांचा लाडका आहे. तो सर्वांना हवाहवासा वाटतो. तो सद्गुरु जाधवकाकांचाही लाडका आहे. ते दळणवळण बंदीच्या आधी त्याच्यासह कधीतरी खेळायचे. तो सर्वांशी आदरयुक्त आणि प्रेमाने बोलतो. त्याच्यामध्ये समजूतदारपणा आहे.
सोहमच्या घरातून निघण्याच्या एक दिवस आधी रात्री त्याने मला दोन शुभेच्छा पत्रे आणून दिली. त्यांतून त्याचे प्रेम आणि प्रगल्भता दिसून येते.
केवळ सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरुदेवांच्या कृपेनेच मी सोहमकडून शिकू शकलो. त्याविषयी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. ‘सोहमकडून मी जे शिकलो आहे, ते कृतीत आणण्यासाठी कृतीच्या स्तरावरील प्रयत्न तुम्हीच माझ्याकडून करवून घ्या’, अशी मी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करतो, तसेच सोहमची पुढील आध्यात्मिक उन्नती आणि संतपदाकडे होणारी वाटचाल शीघ्रगतीने होवो’, अशी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करतो.’
– श्री. सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती (१५.७.२०२०)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |