आरोग्य साहाय्यिकेसमवेत संबंध ठेवल्याच्या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी निलंबित !

कोल्हा (जिल्हा परभणी) येथील प्रकार

वैद्यकीय अधिकार्‍याकडून झालेले कृत्य म्हणजे वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासल्यासारखेच आहे !

परभणी – शासकीय वैद्यकीय सेवेत कर्तव्य बजावत असतांना जिल्ह्यातील कोल्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सहकारी कंत्राटी महिला आरोग्य साहाय्यिकेसमवेत संबंध ठेवल्याच्या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास पवार यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी ६ मार्च या दिवशी निलंबित केले. या संदर्भात डॉ. पवार यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून टाकसाळे यांनी ही कारवाई केली.

डॉ. कैलास पवार यांचे आरोग्य साहाय्यिकेसमवेत संबंध असल्याविषयी अनेक तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या वतीने त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली. चौकशीत वरीलप्रमाणे संबंध असल्याचे दिसून आले. महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ मधील नियम ३ चा भंग करणे, शिस्त आणि अपील ४ प्रमाणे जिल्हा परिषद आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी डॉ. कैलास पवार यांना निलंबित केले असून शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे त्यांच्यावर कारवाई करण्याविषयी शिफारस करण्यात आली आहे.