१. लहानपणापासून कष्ट करून कौटुंबिक कर्तव्ये आनंदाने पार पाडणे
‘आईचे वडील खेड्यात तलाठी होते. त्या वेळी त्यांचे अनेक खेड्यांत ‘जिथे पाण्याचीही सुविधा नाही’, अशा ठिकाणी स्थलांतर होत असे. तेव्हा आईने डोक्यावरून कळश्यांनी पाणी आणणे, नदीवर जाऊन कपडे धुणे, भांडी घासणे, लहान भावंडे आणि रुग्णाईत आई यांची सेवा करणे इत्यादी कामे केली. ती लग्नानंतर मुंबईला सासरी आल्यावर तेथील जीवन तिने सहजतेने स्वीकारले आणि शिकून घेतले. माझे आजी-आजोबा कडक शिस्तीचे, दानशूर आणि कट्टर धर्मपालन करणारे होते. मुंबईत आल्यावर तिने लहान बहिणींच्या शिक्षणाचे दायित्व घेतले आणि त्यांना वेळोवेळी कोणताही विचार न करता आर्थिक साहाय्य केले. आमचे आजोबा ‘ही मंगला माझा मुलगा आहे’, असे म्हणत.
२. बिकट स्थितीत जिद्दीने आणि चिकाटीने शिक्षण पूर्ण करून ‘आयुर्वेदाचार्य’ ही पदवी मिळवणे
आई-बाबांना लग्नानंतर काही वर्षांतच घराबाहेर पडावे लागले. तेव्हा मला आजोळी (आईच्या आईकडे) ठेवून तिने जैन वसतीगृहामध्ये राहून आयुर्वेदाचे शिक्षण घेतले. त्या वेळी महाविद्यालयात अगदी मोजक्याच मुली असायच्या. एक साडी-पोलके यांवर अत्यंत बिकट स्थितीत जैन धर्माचे पालन करून तिने वसतीगृहात राहून शिक्षण घेतले. त्यानंतर काही दिवसांनी तिला सोलापूर येथील एका प्राध्यापकांच्या घरी रहावे लागले. शिक्षण घेत असतांना तिच्या जवळ एक पैसाही नव्हता, घर नव्हते. तिने हलाखीच्या स्थितीत जिद्दीने आणि चिकाटीने शिक्षण पूर्ण करून ‘आयुर्वेदाचार्य’ ही पदवी मिळवली.
४. अचूक निर्णयक्षमता, धाडस आणि आत्मविश्वास असणे
तिने दायित्व घेऊन कर्तव्य पार पाडले. गोरेगाव, मुंबई येथे असतांना वडिलांना त्यांच्या आजारपणामुळे दुकानात जाणे जमत नसे. त्यांच्याकडून कधी कधी अयोग्य रितीने पैशांची देवाण-घेवाण होत असे. तेव्हा आई घरचे सगळे आवरून दुकानात वडिलांच्या बरोबरीने उभी रहात असे. तिने व्यापार्यांशी ओळख काढून कुशाग्र बुद्धीने दुकानातील पैशांचा व्यवहार सांभाळला आणि तोट्यात चाललेले दुकान परत मार्गी लावले. तिच्यात कोणतीही नवीन गोष्ट शिकून घेण्याचा आत्मविश्वास आणि चिकाटी या वयातही आहे. तिने देवद, पनवेल येथे रहायला आल्यावर दुचाकी आणि चारचाकी शिकून घेतली. आईमध्ये तरुणांना लाजवेल, अशी तळमळ, चिकाटी आणि आत्मविश्वास आहे. ‘तिचे आता वय झाले, तरी हे गुण टिकून आहेत’, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे’, असे वाटते.
५. साधना करण्यासाठी मुंबईतील घर आणि दुकान विकून देवद, पनवेल येथे स्थलांतर करणे
साधना करण्यासाठी गोरेगाव येथील स्वतःच्या मालकीचे घर आणि दुकान विकून तिने पनवेल येथील देवद आश्रमाच्या जवळ घर घेण्याचे निश्चित केले. या वेळी बाबांची एक प्रतिष्ठित व्यापारी, तसेच हिंदुत्वनिष्ठ अन् संघाचे स्वयंसेवक अशी ओळख गोरेगावमध्ये होती. देवद येथे नुकतेच बांधकाम चालू असतांना आणि मार्गाची सोय नसतांना तिने मुंबईतील मायानगरी सोडून वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मुंबईत राहूनही तिला कोणत्याही प्रकारचे चित्रपट आणि नाटक बघणे, यांसारखे छंद किंवा चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मोह नव्हता.
६. रुग्णाईत साधकांना पथ्याचे पदार्थ बनवून देणे आणि औषधी तेल बनवणे
रुग्णाईत साधकांच्या वेदना पाहून ‘तिला स्वत:ला वेदना होत आहेत’, अशा तळमळीने ती साधकांना पथ्याचे, आवडीचे आणि रुचकर पदार्थ बनवून देते. तिचा विविध प्रकारची औषधी तेल बनवण्यात हातखंडा आहे, तसेच तिला या वयातही वेगवेगळी औषधे आणि उपचार मुखोद्गत आहेत. ‘आश्रमातील संतांसाठी त्यांच्या प्रकृतीनुरूप विविध सात्त्विक पदार्थ पाठवणे’, ही तिची आवडीची सेवा आहे.’
– सौ. अर्चना हेमंत अंधारे (मोठी मुलगी), डहाणू (२३.११.२०२०)