पुणे, ७ मार्च – ४ वेळा नर्मदा परिक्रमा केलेले लेखक जगन्नाथ केशव कुंटे उपाख्य स्वामी अवधूतानंद (वय ७७ वर्षे) यांचे ४ मार्च या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, २ मुले, मुलगी आणि जावई असा परिवार आहे. कवी कृष्णमेघ कुंटे आणि संवादिनीवादक चैतन्य कुंटे यांचे ते वडील आहेत. ४ मार्चला सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत कुंटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांनी वर्ष २००६ मध्ये संन्यास घेतला होता. स्वामी अवधूतानंद या नावाने ते ओळखले जायचे. नर्मदा परिक्रमांच्या अनुभवांवर आधारलेली ‘नर्मदेऽऽ हर हर’ आणि ‘साधनामस्त’ ही २ पुस्तके कुंटे यांनी लिहिली आहेत. त्यांची ५ पुस्तके पुण्याच्या ‘प्राजक्त प्रकाशन’ने प्रकाशित केली आहेत.