नातेवाइकांच्या घरातील भागवत सप्ताहाच्या वेळी कथा सांगणार्‍या एका महाराजांच्या अयोग्य कृतीविषयी साधिकेला आलेले वाईट अनुभव

​‘हिंदु धर्मातील काही तथाकथित महाराजांमुळेच सर्वसामान्यांची हिंदु धर्मावरील श्रद्धा न्यून होत चालली आहे. पैसे कमावण्याच्या लालसेपोटी असे तथाकथित महाराज समाजाला अध्यात्मशास्त्रविरोधी कृती करायला सांगतात. त्यामुळे स्वतःसह समाजाची कधीही भरून न येणारी हानी करतात. याविषयी साधिकेला आलेला एक वाईट अनुभव येथे देत आहोत. कालच्या लेखात आपण महाराजांनी भ्रमणभाषवर बोलतांना अधिक किमतीचे कपडे घेण्यास सांगणे, महाराजांनी भक्तांकडून भरपूर पैसे घेणे, महाराजांची पूजा करण्याची पद्धत अयोग्य असणे, तसेच देवतांवर फुले फेकल्यासारखी वहात असणे आणि महाराजांनी आरतीमध्ये सहभागी न होता मोठ्याने बोलत रहाणे यांविषयी पाहिले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

(भाग १)

भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा –https://sanatanprabhat.org/marathi/455369.html

सौ. मीना खळतकर

२२. महाराजांनी व्यासपिठावरूनच भाविकांकडे प्रसाद फेकणे आणि त्यामुळे पुष्कळ प्रसाद वाया जाणे

महाराज व्यासपिठावरून प्रसाद वाटतांना रागात दगड मारतो, त्याप्रमाणे भाविकांकडे प्रसाद फेकायचे. एक दिवस एवढा प्रसाद जमा झाला होता की, महाराज दिसतच नव्हते. त्यांनी तेवढा सगळा प्रसाद उपस्थितांमध्ये फेकून वाटला आणि म्हणाले, ‘जिसके नसीब में होगा उसको मिलेगा । आज में हात में नही दूँगा । हमारे वृंदावन में लूट करते है ।’ अशा प्रकारे प्रसादामधील १२ केळ्यांची एक फणी एका काकूंच्या छातीला लागली. प्रसादातील पुष्कळ केळी पायाने चेपून गेली आणि प्रसाद वाया गेला.

२३. या भागवत कथेसाठी माझ्या आईला दीड लाख रुपये इतका व्यय आला. बर्‍याच ठिकाणी अनावश्यक व्यय झाल्याचे आमच्या लक्षात आले.

२४. नारायण नागबळीची पूजा ७ दिवसांपर्यंत तशीच मांडलेली असणे

​आमच्याकडे ‘पितरांच्या कल्याणासाठी भागवत कथेचे आयोजन करतात’, अशी लोकांची समजूत आहे. महाराजसुद्धा तसे म्हणाले होते. त्यामुळे घरात आणि व्यासपिठावर पितरांचे छायाचित्र ठेवून पूजा करतात. कुटुंबियांनी मला ‘नारायण नागबळीची पूजा ३ दिवस राहील’, असे सांगितले होते; पण प्रत्यक्षात ७ दिवस ती पूजा तशीच होती. भंडार्‍याच्या दिवशीही पूजा विसर्जन केली नव्हती.

२५. भागवतकार महाराजांनी सांगितलेल्या अध्यात्मशास्त्रविरोधी कृती आणि पैसे उकळण्याच्या विविध पद्धती

२५ अ. प्रतिदिन १ घंटा प्रवचन आणि पूर्णवेळ नृत्य करणे : प्रतिदिन भागवत कथा सांगतांना त्यांचे १ घंटा प्रवचन आणि पूर्णवेळ नृत्य चालू असायचे. ते उपस्थित सर्व अनुयायांना नाचायला लावायचे. ते म्हणायचे, ‘जो भागवत कथेत नृत्य करतो, त्याला ८४ कोटी योनीत नाचावे लागत नाही. भागवत ऐकल्याने नरकात न जाता वैकुंठात जातात.’

२५ आ. साधिकेने साधनेविषयी ओळखीच्या लोकांना सांगितल्यामुळे महाराजांनी त्यांचे ग्राहक न्यून होत असल्याचे सांगणे आणि महाराजांच्या शिष्यांनी सनातनच्या प्रदर्शन कक्षावर जिज्ञासूंना तसे सांगणे : माझ्या ओळखीचे मला साधनेसंदर्भात प्रश्‍न विचारायचे. मी त्यांना नामजप सांगायचे. तेव्हा महाराजांना वाटायचे, ‘ही जिज्ञासूंना साधना सांगत असल्यामुळे आमचे ग्राहक न्यून होत आहेत.’ तसे त्यांनी माझ्या भावाजवळ बोलून दाखवले. त्यांनी व्यासपिठावरून वरील उद्गार काढले. शेवटच्या दिवशी सनातन संस्थेच्या उत्पादनांचे प्रदर्शन लावले होते. तेव्हा त्यांच्या शिष्यांनी तेथे येऊन तसे जिज्ञासूंना सांगितले. त्यामुळे प्रदर्शनाच्या ठिकाणी अत्यल्प वितरण झाले.

२५ इ. स्थानिक लोकांना शास्त्रानुसार उदबत्ती लावण्याचे महत्त्व सांगितल्यावर त्यांनी ‘महाराज चुकीचे कसे काय सांगतात ?’, असा प्रश्‍न साधिकेला विचारणे : तेथील काही लोकांनी मला उदबत्ती लावण्यासंदर्भात विचारले. तेव्हा मी सांगितले, ‘लाकडे स्मशानात वापरतात, तरीसुद्धा आपण लाकडे यज्ञासाठी वापरतो. बांबूच्या टोपलीत पोळ्या ठेवतो. गुढी बांबूवर उभारतो आणि महाराजांनीसुद्धा भागवताला आरंभ करण्याआधी बांबूची पूजा केली. मग त्याला अशुभ कसे म्हणता येईल ?’ मी सांगितलेले लोकांना पटत होते. ‘महाराज असे कसे काय सांगतात ? आपण तर परंपरेपासून उदबत्ती लावतो’, असे मला म्हणायचे.

२५ ई. महाराजांनी भजने म्हणतांना जोरजोरात टाळ्या वाजवल्याने पाप धुतले जात असल्याचे आणि टाळ्या न वाजवणार्‍या व्यक्तीच्या ओंजळीत उपस्थित सर्वांच्या पापाचे कर्म जमा होत असल्याचे सांगणे : महाराज भजने म्हणतांना जोरात आणि हात वर करून उपस्थितांना टाळ्या वाजवायला लावायचे. टाळ्या वाजवण्याचा वेग न्यून झाला की, पुन्हा जोरात आणि हात वर करून वाजवायला सांगायचे. माझे हात खाली पाहून ते म्हणायचे, ‘‘जे टाळी वाजवतात, त्यांचे पाप धुतले जाते. जे टाळ्या वाजवत नाहीत, त्यांच्या ओटीत (ओंजळीत) सर्वांचे पाप येऊन पडते. उपस्थित सर्वांच्या पापाचे कर्म जमा होते. त्यामुळे तुम्ही ठरवा की, टाळ्या वाजवायच्या कि नाही ?’’ त्यांच्या अशा वक्तव्यामुळे लोक अजून जोरात टाळ्या वाजवायचे. हात दुखू लागले की, हळूहळू हात खाली यायचे. तेव्हा ते परत हात वर करण्यास सांगायचे. ते म्हणायचे, ‘टाळी वाजवल्याने हाताच्या रेषा बरोबर होतात.’

२५ उ. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी पैसे कमावणे :
पहिल्या दिवशी उपस्थिती अल्प होती. त्यामुळे २ सहस्र रुपये जमा झाले. ते महाराजांनी घेतले आणि पुढे ७ दिवस असेच चालू होते. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचे पैसे कमावणे चालू होते. बाकी अन्य गोष्टींकडे त्यांचे अजिबात लक्ष नव्हते.

२५ ऊ. पोथी किंवा छायाचित्राजवळ काजू, किसमिस किंवा लाडू असे पदार्थ ठेवायला सांगणे : महाराज भाविकांना व्यासपिठावरील पोथीला प्रदक्षिणा घालायला सांगत. एक प्रदक्षिणा झाली की, ते स्वतःजवळील एक वस्तू पोथीजवळ किंवा छायाचित्राजवळ ठेवायला सांगत. त्यासाठी ते भाविकांना ड्रायफूट, लाडू असे पदार्थ घरून येतांना घेऊन यायला सांगत. त्यामुळे भाविकही पुष्कळ प्रमाणात पदार्थ आणत होते.

२५ ए. महाराजांनी भक्तांना वृंदावन आणि रामेश्‍वरम्ला येण्याविषयी सांगून १३० जणांचे तिकीट काढून देणे : महाराज भागवत सांगतांना मध्ये मध्ये म्हणत, ‘आप सभी वृदांवन जरूर आना । वहा आपका आदर सन्मान किया जायेगा । वातानुकूलित (एअर कंडिशन) खोली सब मिलेगा । हमारी कथा आपको अच्छी लगे, तो सबको बताना । जिनको रामेश्‍वरम् आना है, उनकी तिकिट मैं निकालके दूँगा । बुकींग शुरू है ।’ यामुळे त्या वेळी उपस्थित १३० जणांनी तिकिट काढले.

२५ ऐ. महाराजांनी सर्वांच्या कुंडल्या पहाणे आणि ‘त्याचे पैसे लागणार नाहीत’,असे सांगूनही प्रत्यक्षात सर्वांकडून त्याचे पैसे घेत असणे : महाराज सर्वांच्या कुंडल्या पहात होते. सकाळी ११ वाजले, तरी त्यांचे कुंडली पहाणे चालू होते. ते उद्घोषणा करतांना ‘कुंडल्या पहाण्यासाठी पैसे लागणार नाहीत’, असे सांगत होते; पण प्रत्यक्षात ते सर्वांकडून पैसे घेत होते. एका व्यक्तीला पुष्कळ त्रास होता. त्यामुळे त्यांनी त्यांचे नारायण नागबळीची विधी केले. त्यांनी त्या मुलाला सुवर्णदान करायला सांगितले. त्या वेळी महाराजांनी यज्ञ सोडून प्रथम त्या मुलाला प्राधान्य दिले.

२५ ओ. आरतीला पैसे जमा व्हावेत; म्हणून महाराज उपस्थित सर्वांना आरती ओवाळायला सांगायचे.

२५ क. दर्शनाला आल्यानंतर भक्तांनी देवाला अर्पण म्हणून आणलेली फळे महाराजांनी स्वतःजवळ ठेवणे, तसेच देवतांचा वेश करून बसवलेल्या मुलांची पूजा करण्यास सांगून त्यांच्या जवळ पैसे ठेवण्यास सांगणे : भागवत सप्ताहाला येणार्‍या लोकांनी मोठ्या प्रमाणात फळे आणली होती. ती त्यांनी स्वतःजवळ ठेवून घेतली. प्रतिदिन भागवत चालू असतांना झाकी (लहान मुलांना राम, कृष्ण आणि राधा या वेशात सिद्ध करून बसवणे) ठेवायचे आणि उपस्थितांना त्यांची पूजा करायला सांगायचे. सर्वजण त्यांची पूजा करून मुलांजवळ असलेल्या एका भांड्यात पैसे टाकायचे. झाकीजवळच्या वाडग्यातील पैसे महाराज व्यासपिठावरून उतरण्याच्या आधीच प्लास्टिकच्या पिशवीत कोंबल्यासारखे भरायचे.

२५ ख. पूर्वी आयोजित केलेल्या भागवत कथेच्या ठिकाणी एका यजमानांच्या लहान मुलाची सोन्याची साखळी महाराजांनी काढून घेणे : याच महाराजांनी यापूर्वी एके ठिकाणी भागवत कथा घेतली होती. तेथील एक व्यक्ती आमच्या येथे आली होती. याच व्यक्तीला त्यांनी सुवर्णदान करण्याविषयी विचारले होते. त्यांनी  मला सांगितले, ‘‘आमच्याकडे भागवत कथा होती, तेव्हा आम्ही आमच्या बाळाला कृष्णासारखे सजवले होते. त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी घातली होती. कृष्णजन्माष्टमी होती; म्हणून त्याला पाळण्यात घातले. पाळणा झाल्यावर ‘साखळी काढूया’, असे म्हणून गेलो, तर महाराज म्हणाले, ‘‘आता ते अर्पण झाले आहे.’’ असे सांगून त्यांनी ती सोन्याची साखळी काढून घेतली.

(समाप्त)

– सौ. मीना खळतकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (डिसेंबर २०१७)

वाचकांना विनंती

या लेखाच्या कालच्या भागात ‘देवाला व्यवस्थितच पदार्थ द्यायला हवा’ म्हणून  साधिकेने पदार्थ चाखून पाहिल्यावर बहिणीने ओरडणे आणि त्यावरून महाराजांनी साधिकेला टोमणे मारणे’ या मथळ्याखाली ‘साधिकेने पदार्थ चाखून पाहिल्याचे म्हटले आहे.’ खरे तर कर्मकांडानुसार पदार्थ चाखणे, हे अयोग्य आहे. प्रत्येक मार्गानुसार कृती ठरलेली असते. जरी साधिकेने शबरीभावाने केलेली कृती योग्य असली, तरी ती कर्मकांडानुसार असे करणे अयोग्य आहे.

भगवान् श्रीकृष्णाच्या दैवी लीला सांगणे, म्हणजे भगवंताची कीर्तन भक्ती आहे. भागवत कथाकार ही कीर्तन भक्ती स्वतः करून समाजाकडूनही करवून घेतात. याद्वारे त्यांची व्यष्टी आणि समष्टी साधना होत असते. अशा प्रकारे साधना म्हणून भागवत सप्ताह करणारे पुष्कळ कथावाचक आज भारतभरात आहेत; मात्र या उत्तुंग साधनेला काही मोजक्या कथावाचकांच्या अयोग्य वर्तनामुळे गालबोट लागू नये आणि ही भागवत सप्ताह परंपरा अव्याहतपणे समाजाला भक्तीमार्गाकडे वळवणारी व्हावी, हाच हा लेख छापण्यामागील उद्देश आहे. भगवद्नामाचे श्रवण आणि कीर्तन करतांना नृत्य करणे, टाळ्या वाजवत अथवा अन्य वाद्ये वाजवत भजने म्हणणे हेही नवविधा भक्तीचे एक अंग आहे; मात्र याचे मौजमजेमध्ये रूपांतर होऊन भगवद्भक्तीच्या मूळ उद्देशापासून दूर जाणे सर्वथा अयोग्य राहील, याचे भक्तांनी भान ठेवणे आवश्यक आहे. कथावाचकांनी उपस्थित भक्तांना याची शिकवण देणे आवश्यक आहे.
​सरसकट सर्वच कथावाचक आणि पर्यायाने प्रवचनकार, कीर्तनकार आदि असे अयोग्य वर्तन करणारे नसतात, हे या ठिकाणी लक्षात ठेवावे. साधना म्हणून भावपूर्णरित्या आणि समाजात भक्तीभाव वाढावा, या उदात्त हेतूने कथावाचन करणार्‍यांच्या संदर्भात आलेले चांगले अनुभव वाचकांनी अवश्य दैनिक ‘सनातन प्रभात’ला पाठवावेत. यातून मोजक्या वाईट अनुभवांमुळे समाजामध्ये अशा कार्यक्रमांच्या संदर्भात असलेले अपसमज दूर होण्यास साहाय्य होईल. तसेच परिस्थितीमुळे अशाप्रकारे गैरवर्तन होत असलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे लागल्यास भाविकांनी स्वत: श्रद्धायुक्त राहून ईश्‍वराच्या आशीर्वादाचा लाभ करून घेण्याकडे लक्ष केंद्रित करावे. त्यामुळे त्यांचा अमूल्य वेळ परिस्थितीमुळे वाया न जाता त्यांना मात्र व्यक्तीगत स्तरावर लाभच होईल. – संपादक