सांगली, २ मार्च (वार्ता.) – शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात १ मार्चपासून तिसर्या टप्प्यातील लसीकरणास प्रारंभ झाला आहे. या टप्प्यात ६० वर्षांवरील आणि ४५ ते ५९ वर्षे या वयोगटातील व्याधीग्रस्त असलेले लाभार्थी यांची अॅपद्वारे नोंदणी करून लसीकरण करण्यात येणार आहे. राज्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात संमत करण्यात आलेल्या शासकीय रुग्णालयांपेक्षा कोल्हापूर जिल्ह्यात तीनपट रुग्णालये संमत करण्यात आली आहेत. १६ खासगी रुग्णालयांमध्येही ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोनामुळे यापुढे जिल्ह्यात एकही मृत्यू होणार नाही यांसाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी २ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.
१. ही लस घेण्यासाठी अॅपद्वारे प्रत्येकाला नोंदणीकरण बंधनकारक आहे. ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना नोंदणीकृत वैद्यकीय अधिकार्यांकडून प्रमाणपत्र घेऊन ते लसकेंद्रावर सादर करणे बंधनकारक आहे. एकूण १२० केंद्रांवर ही लस देण्यात येणार आहे.
२. खासगी रुग्णालयात लस २५० रुपयांना मिळणार असून यातील १५० रुपये हे शासनासाठी, तर १०० रुपये त्या रुग्णालयाचा सेवा कर असणार आहे.
३. कोरोना लसीकरणासाठी ६ लाख ६१ सहस्र ९४८ लाभार्थी अपेक्षित आहेत. लसीविषयी कोणतीही शंका नागरिकांनी बाळगण्याची आवश्यकता नाही, तसेच कोणत्याही गैरसमजास नागरिकांनी बळी पडू नये. लसीकरणाची संख्या मोठी असल्याने अधिकाधिक नागरिकांनी लवकरात लवकर अॅपवर नोंदणी करावी.