इंग्रजांना सळो कि पळो करून सोडणारे चंद्रशेखर आझाद !

२७ फेब्रुवारी २०२१ या दिवशी क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांचा बलीदानदिन आहे. या निमित्ताने…

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म मध्य भारतातील झाबुआ तहशिलीतील भाबरा गावी झाला. बनारसला संस्कृतचे अध्ययन करत असतांना वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ते इतके लहान होते की, त्यांना पकडण्यात आले, तेव्हा त्यांच्या हातांना हातकडीच बसेना. ब्रिटीश न्यायालयाने त्यांना १२ फटक्यांची अमानुष शिक्षा दिली. फटक्यांनी आझादांच्या मनाचा क्षोभ अधिकच वाढला आणि अहिंसेवरील त्यांचा विश्‍वास पार उडाला. मनाने ते क्रांतीकारक बनले. काशीत श्री. प्रणवेश मुखर्जींनी त्यांना क्रांतीची दीक्षा दिली. क्रांतीकारी पक्षाने वर्ष १९२१ ते १९३२ पर्यंत ज्या ज्या क्रांतीकारी चळवळी, प्रयोग, योजना आखल्या, त्यात चंद्रशेखर आझाद आघाडीवर होते.

चंद्रशेखर आझाद यांनी केलेली प्रतिज्ञा सत्यात उतरणे !

‘मी जिवंतपणी ब्रिटीश सरकारच्या हाती कधीच पडणार नाही’, ही आझाद यांची प्रतिज्ञा होती. २७ फेब्रुवारी १९३१ ला ते शेवटचे अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये शिरले. पोलीस अधीक्षक नॉट बॉबरने तेथे येताच क्षणी आझादांवर गोळी झाडली. ती त्यांच्या मांडीस लागली; पण त्याच वेळी आझादांनी नॉट बॉबरवर गोळी झाडून त्याचा हातच निकामी केला. मग ते सरपटत एका जांभळीच्या झाडाआड गेले. त्यानंतर त्यांनी हिंदी शिपायांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्यांच्या आपल्या पिस्तुलात शेवटची गोळी राहिली, तेव्हा त्यांनी ते आपल्या मस्तकाला टेकवले आणि चाप ओढला ! तत्क्षणी त्यांचे प्राण त्यांचा नश्‍वर देह सोडून पंचतत्वात विलीन झाले. नॉट बॉबर उद्गारला, ‘‘असे सच्चे निशाणबाज मी फार थोडे पाहिले आहेत !’’ या वेळी पोलिसांनी त्यांच्या निष्प्राण देहात संगिनी खुपसून ते मेल्याची खात्री करून घेतली.

चंद्रशेखर आझाद यांचे वैशिष्ट्यपूर्ण उद्गार

चंद्रशेखर आझाद एका खिशात भगवद्गीता आणि दुसर्‍या खिशात बंदूक ठेवत असत. एकदा त्यांचा मित्र त्यांना म्हणाला, ‘‘बंदूक ठेवणे शोभत नाही, योग्य नाही.’’ त्यावर चंद्रशेखर म्हणाले, ‘‘श्रीकृष्णाच्या मुखात गीता आणि हातात सुदर्शन चक्र शोभते, तर माझ्या हातात गीता आणि बंदूक यात काय वाईट आहे ?’

(संदर्भ : ‘बालसंस्कार’ संकेतस्थळ)