कोरोना मोठ्या प्रमाणात पसरण्यास नागरिकांचा हलगर्जीपणा कारणीभूत !
अकोला – जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यात सध्याचा कोरोनाचा विषाणू मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरवत असून नागरिकांचा हलगर्जीपणाही त्यासाठी कारणीभूत ठरत आहे, असे मत आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी २४ फेब्रुवारी या दिवशी येथे एका वृत्तवाहिनीशी बोलतांना व्यक्त केले. कोरोना संपला असे गृहीत धरून रहाणेच कोरोनावाढीसाठी कारणीभूत ठरले आहे; मात्र ‘मास्क’, ‘सॅनिटायझर’ आणि सामाजिक अंतर या ३ सूत्री कार्यक्रमांची जर सातत्याने कार्यवाही केली असती, तर कोरोना हा डिसेंबर मासाच्या तुलनेत अधिक प्रमाणात आटोक्यात आला असता, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘सध्याचा कोरोनाबाधित रुग्ण हा कोरोनाचा अधिकाधिक प्रसार करणारा म्हणून गणला जात आहे. रुग्णांमध्ये सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे अधिक दिसत आहेत. ८५ टक्के रुग्ण हे या लक्षणांमध्ये आढळत असून १० ते १५ टक्के हे रुग्ण अधिक प्रमाणात लक्षणे दिसून आल्यावर उपचार घेत आहेत; परंतु या ८५ टक्के रुग्णांपासून धोका वाढला आहे. त्यांच्याकडून कोरोना मोठ्या प्रमाणात पसरत आहे, ही गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे.’’
अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या रुग्णांमध्ये जोखमीचे प्रमाण अल्प असले, तरी रुग्णसंख्या वाढणे ही चिंताजनक गोष्ट आहे. या संदर्भात नागरिकांनी सतर्क राहून स्वतःची काळजी स्वतः घेणे आवश्यक आहे. त्यासमवेतच ‘सॅनिटायझर’, ‘मास्क’ आणि सामाजिक अंतर यांचे पालन करणे आवश्यक आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.