पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – माघ यात्रेसाठी शहरातील काही मठ आणि धर्मशाळा येथे यापूर्वीच आलेल्या भाविकांना मठाबाहेर काढू नये, वारकर्यांना मठ आणि धर्मशाळा येथून बाहेर काढण्यास पोलिसांनी बळजोरी केल्यास वारकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, अशी चेतावणी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी दिली आहे. २ ‘ई-रिक्शां’च्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमानंतर ह.भ.प. बंडातात्या कराडकर पत्रकारांशी बोलत होते.
या लोकार्पण सोहळ्याला मंदिर समितीच्या सदस्या अधिवक्त्या माधवी निगडे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, राणा महाराज वासकर, केशव महाराज नामदास आदी उपस्थित होते. प्रशासनाने संचारबंदीचा निर्णय विलंबाने घेतल्याने अनेक भाविक शहरातील विविध मठांमध्ये वास्तव्यास आले आहेत. मठांमध्ये वास्तव्यास आलेल्या वारकर्यांना पोलिसांनी मठाबाहेर काढण्यास प्रारंभ केला आहे. वारकर्यांना मठ सोडून शहराबाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर बंडातात्या कराडकर यांनी पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला आहे.
खरेतर ही मोगलाई म्हणायला हवी ! – ह.भ.प. हनुमंत वीर महाराज, राष्ट्रीय प्रवक्ता, वारकरी संप्रदाय पाईक संघ
चोरट्यांचा वाढवला मान । कीर्तीवानाचा केला अपमान । धुंद झाला तुझा दरबार । या संत जनाबाईंच्या वचनाची आज प्रकर्षाने आठवण होत आहे. लाखोंच्या संख्येने असणारा वारकरी संप्रदाय सहिष्णुता म्हणून शासनाला साहाय्य करत असूनही हे धर्मद्रोही शासन वारीच्या परंपरेवर जाणीवपूर्वक कठोर निर्बंध लादत आहे. खरेतर ही मोगलाईच म्हणायला हवी !