मंदिरांच्या भूमीचे १ मार्चपासून सर्वेक्षण करणार !

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची माहिती

अवैधपणे वापर होत असलेल्या मंदिरांच्या भूमी कह्यात घेणार !

कुडाळ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मंदिरांमध्ये असंख्य प्रश्‍न निर्माण झाले आहेत. हे प्रश्‍न सोडवण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातील मंदिरांच्या मालकीच्या भूमी वहीवाटदार आणि लिलावदार यांना कुटुंबाचा निर्वाह करण्यासाठी दिलेल्या आहेत. या भूमींचा अवैधपणे वापर झाल्यास या भूमी कह्यात घेण्यासाठी देवस्थान समिती संबंधितांना नोटीस बजावणार आहे. १ मार्चपासून देवस्थानांच्या भूमीचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याला सर्वांनी सहकार्य करावे. जो कुणी याला विरोध करील, त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.

समितीचे अध्यक्ष महेश जाधव आणि सदस्य सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर आले होते. या वेळी त्यांनी समितीच्या अखत्यारित येत असलेल्या काही मंदिरांना भेट दिली, तसेच तेथील समस्या जाणून घेतल्या. या वेळी त्यांनी जिल्ह्यातील देवस्थान समित्यांना मार्गदर्शनही केले. या वेळी राजेंद्र जाधव, गरुड, चारुदत्त देसाई, विजय पवार, शीतल इंगवले, सुरेश पाटील, देविका झरक पाटील, उत्तम मिटके, बाळकृष्ण ननावरे आदी उपस्थित होते.

कुडाळ येथे केलेल्या मार्गदर्शनात जाधव पुढे म्हणाले की,

१. वहीवाटदार आणि लिलावदार (लिलावातून भूमी घेतलेले) यांनी देवस्थानांच्या भूमीवर कर्ज घेतले असल्यास त्यांनी हे कर्ज भरून तो बोजा उतरवावा (कर्ज घेतल्याची सातबारावरील नोंद वगळणे), तसेच देवस्थान समितीला वहीवाटदार आणि लिलावदार खंड देत नाहीत, तो दिला पाहिजे. या भूमीमध्ये पोटकुळे, उपकुळे, भाडेतत्त्वावर देणे असे चुकीचे प्रकार होत आहेत. असे प्रकार आढळून आल्यास त्यांच्या कह्यातील भूमी देवस्थान समिती कह्यात घेणार.

२. देवस्थान समितीच्या भूमीचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामुळे देवस्थानची एकूण भूमी किती आहे, याविषयी लवकरच स्पष्टता येईल.

३. या भूमी कसण्यासाठी दिलेल्या होत्या; परंतु काहीनी या भूमींवर अवैधपणे बांधकामेदेखील केली आहेत. कोकणात समितीच्या मालकीची २८ सहस्र एकर भूमी आहे, ३८ सहस्र ४२ मंदिरे समितीकडे आहेत. या सर्व भूमींचे आणि मंदिरांचे तहसीलदार अन् भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

४. कोकणातील मंदिरांना देवस्थान समिती साहाय्यही करणार आहे. चांगल्या कामाचे कौतुक, तर अवैध कामांना चाप लावण्याचे काम आम्ही करणार आहोत.