माजी जिल्हा न्यायाधिशाने त्याच्या कार्यकाळात अन्य कुणाशी असे कृत्य केले होते का ? याचाही आता शोध घेण्याची आवश्यकता आहे ! अनैतिक कृत्य कुठपर्यंत होत आहेत, हे यातून लक्षात येते !
नवी देहली – कनिष्ठ महिला न्यायाधिशाला स्पर्श करण्याची, तसेच पती-पत्नीसारखे संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त करणारे मध्यप्रदेशचे माजी जिल्हा न्यायाधीश यांना सर्वोच्च न्यायालयाने न्यायव्यवस्थेत अशा प्रकारचे वर्तन अजिबात मान्य नाही, अशा शब्दांत फटकारले. या प्रकरणात मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने स्वत:हून नोंद घेत, कारवाई केली होती. त्याविरोधात निवृत्त न्यायाधीशाने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून दाद मागितली होती. त्यांनी म्हटले होते, महिला न्यायधिशाने विषय संपवण्याचा निर्णय घेतलेला असतांना, आता या प्रकरणात कुठली चौकशी होऊ नये. माजी न्यायाधिशांचे वर्तन हे पदाला शोभणारे नाही. त्यामुळे स्वत:हून या प्रकरणाची नोंद घ्यावी लागली, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते.