दळणवळण बंदी शिथिल होऊनही वीजदेयके न भरणारे ग्राहक कर्तव्यचुकारपणा करून संबंधितांना वीजपुरवठा खंडित करण्यासाठी भाग पाडतात. अशा कृतीमुळे महावितरणाच्या कामाची फलनिष्पत्ती न्यून होते, हे लक्षात घ्यायला हवे.
पुणे – पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील वीजग्राहकांकडे वीजदेयकांची एकूण १ सहस्र ९६२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यापैकी १ सहस्र २४७ कोटी रुपये थकबाकी असणार्या १४ लाख ग्राहकांनी १ एप्रिल २०२० पासून एकदाही वीजदेयक भरलेले नाही. यामध्ये औद्योगिक, वाणिज्यिक आणि घरगुती ग्राहकांचा समावेश आहे. अशा १४ लाख ग्राहकांनी तातडीने वीजदेयक भरले नाही, तर पुढील ३ आठवड्यांत त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल, असे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत.