ठाणे येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भित्तीचित्राचे उद्घाटन
ठाणे, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – देशात आणि राज्यात सत्ता कुणाचीही असो; पण राज्य हे हिंदूंचे असलेच पाहिजे. थोर महापुरुषांचे नुसते प्रेमी किंवा भक्त न होता आपण त्यांचे विचार प्रत्यक्षात आत्मसात करून कृतीशील अनुयायी होण्याची आज आवश्यकता आहे, असे उद्गार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि विक्रमराव सावरकर यांचे पुत्र श्री. रणजीत सावरकर यांनी काढले.
ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते आणि नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या संकल्पनेतून येथील श्रीराधाकृष्ण मंदिराजवळ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भित्तीचित्र साकारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन श्री. रणजीत सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
कार्यक्रमप्रसंगी उपमहापौर पल्लवी कदम, नगरसेविका सौ. कांचन चिंदरकर, शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रॉकी हिंदुस्थानी, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे विश्वस्त शैलेंद्र चिखलकर, हिंदु महासभेच्या गौरक्षा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पांडुरंग भिसे अन् महाराष्ट्र प्रदेश सचिव कोठरगी, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ठाणे येथील धारकरी अशोक वायकुळे, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि धर्माभिमानी हिंदु नागरिक या वेळी उपस्थित होते.