|
देवगड – देवगड पंचायत समितीच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये ४ कर्मचार्यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. या रकमेमधून त्यांनी मोठे बंगले बांधले असून गावाकडे स्थावर संपत्ती विकत घेतली आहे. शासकीय कर्मचार्यांकडे एवढा पैसा आला कुठून ? हाच मोठा प्रश्न आहे. या कर्मचार्यांनी कोणत्या मार्गाने पैसा मिळवला, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. चौकशीअंती दोषी कर्मचार्यांवर फौजदारी गुन्हा नोंद करावा, अशी मागणी सदस्य अजित कांबळे यांनी केली.
देवगड पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा येथील छत्रपती संभाजी महाराज सभागृहात सभापती लक्ष्मण पाळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपसभापती रवींद्र तिर्लोटकर, साहाय्यक गटविकास अधिकारी अरुण चव्हाण आदी उपस्थित होते.
कांबळे यांनी देवगड शिक्षण विभागातील ४ कर्मचार्यांनी वर्ष २०१० ते २०१५ या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचे समजते. या कर्मचार्यांकडे एवढा पैसा कोणत्या मार्गाने येत होता ? प्रत्येक मासाला वेतनाव्यतिरिक्त काहीच अन्य व्यवसाय नसतांना एवढी संपत्ती कशी प्राप्त होते ? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्या कर्मचार्यांची नावे या प्रकरणाची चौकशी शासकीय स्तरावरून होईल, तेव्हा देईन, असे कांबळे यांनी सांगितले.
या वेळी गटविकास अधिकारी चव्हाण यांनी ‘हे प्रकरण गांभीर्याने घेतले जाईल, तसेच सदस्यांनी केलेल्या विधानानुसार सखोल चौकशी केली जाईल’, असे सांगितले.
दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणारे प्रमाणपत्र त्यांना घरपोच प्राप्त होण्यासाठी आरोग्य विभागाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावा, अशी सूचना सदस्य सदाशिव ओगले यांनी आरोग्य विभागाला केली. या वेळी तालुक्याचा पाणीटंचाईचा आराखडा, एस्.टी. बससेवा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.