सनातनची साधिका कु. नकुशा नाईक ‘बी.एस्.सी. नर्सिंग’च्या द्वितीय वर्षात कर्नाटक राज्यात प्रथम !

सुवर्णपदक आणि पुरस्कार यांसह कु. नकुशा नाईक

रामनगर (बेळगाव) – येथील सनातनची साधिका कु. नकुशा रामा नाईक ही ‘बी.एस्.सी. नर्सिंग’च्या द्वितीय वर्षात कर्नाटक राज्यात प्रथम आली आहे. ती ‘राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, बेंगळुरू’च्या अंतर्गत ‘के.एल्.ई. सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सोसायटी, हुबळी’ येथे शिक्षण घेते. नुकतेच तिला सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रमुख उपस्थिती होती. यासह राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री यांचीही उपस्थिती होती. कु. नकुशा हिने तिच्या यशाचे श्रेय परात्पर गुरु डॉ. आठवले आणि शिक्षकजन यांना अर्पण केले.

अभ्यास करतांना आणि परीक्षेच्या वेळी कु. नकुशा हिने आध्यात्मिक स्तरावर केलेले प्रयत्न !

शिक्षण घेतांना आणि परीक्षेपूर्वी अभ्यास करतांना कु. नकुशा हिने परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांचे स्मरण करणे, आध्यात्मिक उपाय करणे, नामजपाची ध्वनीफीत लावणे आदी प्रयत्न केले. परीक्षेच्या कालावधीत ती ‘मानसरित्या गुरुदेवांच्या आश्रमात जाऊन त्यांच्या चरणांशी बसून प्रश्‍नपत्रिका सोडवत आहे’, असा भाव ठेवत होती. परीक्षेपूर्वी भगवान श्रीकृष्णाचा श्‍लोक म्हणणे, सर्व साहित्याला वंदन करणे, तसेच परीक्षा संपल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करणे आदी प्रयत्न ती करत होती. परीक्षेच्या वेळामध्ये तिची लहान बहीण कु. प्राप्ती तिच्यासाठी नामजपादी उपाय करत असे.