१. सेवेसाठी महाबळेश्वरला जातांना अर्ध्या घाटात रात्री १० वाजता दुचाकी बंद पडणे
१ अ. मार्गातून जाणार्या वाहन चालकांना हात करूनही त्यांनी साहाय्य न करणे, थंडीने गारठून जाणे आणि चोर अन् जंगली प्राणी यांची भीती वाटणे : ‘एप्रिल २००२ मध्ये आम्ही (मी आणि श्री. श्रीराम पुराणिककाका) श्रीक्षेत्र तीर्थ महाबळेश्वर (सातारा) येथे ग्रंथप्रदर्शन, प्रसार, प्रचार या सेवांसाठी दुपारी देवद आश्रमातून दुचाकीने (वेस्पा स्कूटरने) निघालो होतो. पोलादपूरपासून पुढे महाबळेश्वरला जातांना घाटात अर्ध्यावर रात्री १० वाजता आमची दुचाकी बंद पडली. मार्गाच्या दोन्ही बाजूला काळाकुट्ट अंधार आणि दाट झाडी होती. घाटात पुष्कळ थंडी होती. प्रत्येक १० ते १५ मिनिटांनी चारचाकी वाहन येत होते; पण हात दाखवूनही कुणी चारचाकी थांबवत नव्हते. ‘एखादा गाडीवाला थांबला, तर त्याच्या गाडीत आमच्या समवेत असलेल्या साहित्यासह बसण्यास जागा असेल का ? दुचाकी अशी मार्गात सोडून कसे जायचे ? रात्रभर येथे राहिलो, तर थंडीने आमचा बर्फच होऊन जाईल’, असे विचार आमच्या मनात येत होते. आम्हाला चोर आणि जंगली प्राणी यांची भीतीही वाटत होती. आम्ही चारचाकींना एक घंटा हात दाखवूनही एकही गाडी थांबली नाही. आम्ही थंडीने थरथरत होतो. आम्हाला नीट बोलताही येत नव्हते.
१ आ. साहित्याच्या खोक्यावर कपड्यांच्या पिशव्या बांधल्या असल्याने थंडीपासून होणारा त्रास न्यून करण्यासाठी पिशवीतील कपडे काढता न येणे : आमच्या समवेत १८ इंची दूरदर्शन संच बसेल एवढा खोका, म्हणजे ५० ते ६० किलो वजनाचे साहित्य होते. त्या व्यतिरिक्त काकांची एक सूटकेस आणि एक पिशवी, माझ्या कपड्यांची एक पिशवी आणि प्रसारासाठी वापरायची एक लहान पिशवी एवढे साहित्य होते. साहित्याचा खोका आणि त्यावर कपड्यांच्या दोन पिशव्या बांधल्या असल्यानेे दोरी सोडून थंडीपासून होणारा त्रास न्यून करण्यासाठी आम्हाला पिशवीतील कपडेही काढता येत नव्हते. देवाच्या कृपेने एखादा गाडीवाला थांबला, तर ‘सोडलेल्या साहित्याची बांधाबांध करेपर्यंत तो थांबेल का ?’, असाही विचार आमच्या मनात येत होता. ‘मनात विचार येणे आणि देवाचा धावा करणे’, असे आमचे चालू होते.
१ इ. एका ट्रकचालकाने साहाय्य करणे
१ इ १. परात्पर गुुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर एका ट्रकचालकाने विचारपूस करून एका उपहारगृहात पोचवण्याची सिद्धता दर्शवणे : दुचाकी ज्या ठिकाणी बंद पडली, तेथे दरीसारखा खोल भाग असल्याने तेथे बाजूला सिमेंटचा कठडा बांधलेला होता. आम्ही सर्व विचार त्यागून तेथे बसून नामजप करण्याचे ठरवले. माझ्याकडे परात्पर गुुरु डॉक्टर आठवले यांचे लहान आकाराचे छायाचित्र होते. ते हाताच्या ओंजळीत ठेवून आम्ही त्यांना प्रार्थना केली, ‘तुम्हाला जसे अपेक्षित आहे, त्याप्रमाणे होऊ देत.’ नंतर जेमतेम ५ मिनिटे झाली असतील. महाबळेश्वरकडून पोलादपूरच्या दिशेने जाणारा एक मोठा ‘टाटा ट्रक’ (फुलबॉडी असणारा) त्याला हात न दाखवताही आमच्याजवळ येऊन थांबला. ट्रकमध्ये चालकासह चार माणसे होती. ट्रक चालकाने ‘काय झाले ? कुठे चाललात ?’, असे आम्हाला विचारले. तेव्हा मी म्हणालो, ‘‘महाबळेश्वरला जायचे आहे. आमची दुचाकी बंद पडली आहे.’’ ट्रक चालक म्हणाले, ‘‘तुम्हाला आता तिकडे जाणारी गाडी मिळणार नाही. रात्र पुष्कळ झाली आहे. तुम्ही पुढे न जाता मागे १० कि.मी. अंतरावर एक उपहारगृह आहे, मी तेथे तुम्हाला सोडतो. तेथे तुमची निवास आणि भोजन यांची व्यवस्था होईल. उपहारगृहाच्या बाजूला घरेही आहेत. तेथे रात्री थांबून सकाळी गाडीचे काम करून पुढे जा.’’ आम्ही त्यांना लगेच होकार दिला.
१ इ २. ट्रकमधील व्यक्तींनी बांधलेल्या सामानासह दुचाकी ट्रकमध्ये चढवणे आणि उपहारगृहाजवळ पोचल्यावर खाली उतरवून देणे अन् त्यांनी नम्रपणे पैसे घेण्यास नकार देणे : नंतर ट्रकमध्ये पुढे बसलेले चार जण खाली उतरले. त्यांनी दुचाकी बांधलेल्या सामानासह ट्रकमध्ये ठेवली. आम्ही उपहारगृहाच्या ठिकाणी पोचल्यावर पुन्हा त्यांनी दुचाकी खाली उतरवून दिली. दुचाकी ट्रकमध्ये चढवतांना आणि खाली उतरवतांना त्यांनी आम्हाला हातही लावू दिला नाही. ‘तुम्ही राहू द्या. आम्ही करतो’, असे ते म्हणाले. मी त्यांचे आभार व्यक्त करून त्यांना काही पैसे देऊ केले; परंतु त्यांनी नम्रपणे पैसे घ्यायला नकार दिला अन् ते पुढे निघाले.
१ इ ३. कृतज्ञताभावाने सहसाधकाकडे पहात असतांना ट्रक दिसेनासा होणे, ‘परात्पर गुरुदेवांनी सूक्ष्मातून साहाय्य करून सुरक्षित ठिकाणी आणून सोडले’, याची जाणीव होऊन त्यांच्याप्रती श्रद्धा दृढ होणे : ट्रक चालकाचा चांगुलपणा, इतरांना साहाय्य करण्याची त्याची वृत्ती बघून ‘देवानेच (परात्पर गुरुदेवांनीच) त्यांना आपल्या साहाय्यासाठी पाठवले’, या कृतज्ञतेच्या भावाने आम्ही (मी आणि काकांनी) एकमेकांकडे काही क्षण बघून पुन्हा गाडीकडे पाहिले, तर तो ट्रक आम्हाला दिसलाच नाही. जेवढा वेळ आम्ही एकमेकांकडे पाहिले होते, तेवढ्या वेळात ट्रक अधिकाधिक १५ ते २० मीटर एवढेच अंतर पुढे जाऊ शकतो. आम्हाला ज्या उपहारगृहाजवळ उतरवले होते, तेथून १५० ते २०० मीटर सरळ रस्ता होता, म्हणजे ट्रक बर्याच लांबवर जाईपर्यंत आम्हाला दिसू शकत होता. अडचणीच्या वेळी साहाय्य न मिळाल्याने आम्ही सर्व परात्पर गुरुदेवांवर सोपवून तेथे नामजप करायला बसल्याने ‘प्रत्यक्ष परात्पर गुरुदेवांनी सूक्ष्मातून येऊन आम्हाला साहाय्य केले अन् सुरक्षित ठिकाणी आणून सोडले’, असा विचार आमच्या दोघांच्या मनात येऊन आमची पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होऊन भावजागृती झाली आणि त्यांच्याप्रती आमची श्रद्धा पुष्कळ दृढ झाली.
२. परात्पर गुरुदेवांनी रात्री सूक्ष्मातून येऊन अन् सकाळी घरमालकाच्या माध्यमातून केलेल्या साहाय्याच्या विचाराने रात्री झालेला शारीरिक अन् मानसिक त्रास पूर्णपणे विसरून जाणे
रात्री उशीर झाल्याने आम्ही केवळ चहा आणि बिस्किटे घेतली. उपहारगृहवाल्याच्या ओळखीने रात्री आमची झोपण्याची व्यवस्था झाली. आम्ही सकाळी निघण्याच्या सिद्धतेत असतांना घरमालकाने आम्हाला चहा दिला आणि ते सहजच म्हणाले, ‘‘प्लग वायर निघाल्यामुळे कदाचित् गाडी बंद पडली असणार.’’ त्यांच्या म्हणण्यानुसार मी दुचाकीच्या इंजिनच्या बाजूचे (बोनट) झाकण काढून पाहिले, तर खरेच प्लग वायर निघाली असल्याचे मला दिसले. ती प्लग वायर जोडून मी दुचाकी चालू करण्याचा प्रयत्न केल्यावर (अर्ध्या किक मध्ये) दुचाकी लगेच चालू झाली. त्या वेळी परात्पर गुरुदेवांनीच घरमालकाच्या मनात विचार घालून पुन्हा साहाय्य केले, नाहीतर आम्हाला धक्का देऊन दुचाकी ‘गॅरेज’पर्यंत घेऊन जावी लागली असती आणि ‘गॅरेज’ कुठे आहे ?’, हेही आम्हाला ठाऊक नव्हते. दुचाकी बंद पडल्यावर थंडीमुळे आणि विचारांमुळे आम्हाला झालेला शारीरिक अन् मानसिक त्रास आम्ही पूर्णपणे विसरून गेलो होतो.
परात्पर गुरुदेवांनी रात्री सूक्ष्मातून येऊन केलेले साहाय्य आणि सकाळी घरमालकाच्या माध्यमातून केलेल्या साहाय्याच्या विचारात आणि कृतज्ञताभावातच आम्ही महाबळेश्वर येथे ग्रंथ प्रदर्शनाच्या ठिकाणी सुखरूप पोचलो. रात्री आणि सकाळी घडलेला प्रसंग सौ. लोटलीकरकाकूंना सांगितल्यावर आमची पुन:पुन्हा कृतज्ञता व्यक्त होऊन सर्वांची भावजागृती झाली.’
– श्री. अशोक शांताराम दहातोंडे, शिरोडा, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. (२९.८.२०१७)
प्रकृती ठीक नसतांना परात्पर गुरुदेवांना संपूर्ण शरण गेल्याने वाहनचालकाची आणि सभेचे चित्रीकरण करण्याची सेवा करू शकणे
१. संभाजीनगर येथे सभा असतांना वाहनचालकाची आणि चित्रीकरण करण्याची सेवा करायची असणे, चित्रीकरणाविषयी काही ठाऊक नसतांना परात्पर गुरुदेवांना संपूर्ण शरण जाऊन सेवेविषयीची सूत्रे संबंधित साधकाकडून समजून घेणे
वर्ष ‘२००४ मध्ये संभाजीनगर येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वेगवेगळ्या संप्रदायांचे सात ‘संत-महंत’ एकाच व्यासपिठावर उपस्थित रहाणार होते. त्या वेळी सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि श्री. रमेश शिंदे यांच्यासह वाहन चालक म्हणून जाण्याची सेवा मला मिळाली. ‘तुम्हाला या सभेचे चित्रीकरण करायचे आहे’, असे सांगून आदल्या रात्री श्री. योगेश शिंदे आणि चित्रीकरण विभागातील साधकांनी चित्रीकरणाविषयीची सूत्रे सांगून माझा ३० मिनिटे सराव करून घेतला. माझ्यासाठी ‘छायाचित्रकाला (कॅमेराला) स्पर्श करणे अन् चित्रीकरण करणे’, ही पहिलीच वेळ होती. मला त्याविषयीचा पूर्ण अनुभवही नव्हता. ‘देवाला सर्वकाही ठाऊक असून तोच सर्वकाही करणार आहे’, या भावाने परात्पर गुरुदेवांना संपूर्ण शरण जाऊन कोणताही ताण न घेता सेवेविषयीची सर्व सूत्रे मी संबंधित साधकाकडून समजून घेतली.
२. देवद आश्रम ते संभाजीनगर या प्रवासात वाहनचालकाची सेवा करणे
२ अ. कसारा घाटात सर्वत्र हिरवळ आणि थंडगार वातावरण असल्याने साधकांनी तिकडेच झर्याजवळ बसून दुपारचे जेवण घेणे : दुसर्या दिवशी सकाळी अल्पाहार करून देवद आश्रम, पनवेल येथून आम्ही (मी, श्री. रमेश शिंदे, डॉ. आरती तिवारी आणि निफाड येथील २ साधक) निघालो. आम्ही ठाणे सेवाकेंद्रात गेल्यावर सद्गुरु राजेंद्र शिंदे चारचाकीत बसले. आम्ही दुपारचे जेवण आश्रमातून समवेत घेऊन निघालो होतो. पावसाळ्याचे दिवस असल्याने नाशिककडे जातांना कसारा घाटात सर्वत्र हिरवळ आणि थंडगार वातावरण असल्याने आम्ही तिकडेच झर्याजवळ बसून दुपारचे जेवण केले. नाशिकला पोचून काळाराम मंदिर येथे नाशिक येथील साधकांचा सत्संग आणि सद्गुरु राजेंद्रदादांचे मार्गदर्शन झाल्यावर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास निफाड येथील २ साधकांना बस स्टँडकडे पोचवून आम्ही संभाजीनगरकडे रवाना झालो.
२ आ. पोटात डावीकडे मूतखड्यामुळे दुखायला लागून त्याचे प्रमाण वाढत जाणे, तसेच पुष्कळ ताप येणे आणि बाहेर मुसळधार पाऊस पडत असतांना घाम येऊन कपडे ओलेचिंब होणे : नाशिक येथून काही अंतर पुढे आल्यावर माझ्या पोटात डाव्या बाजूला मूतखड्यामुळे (किडनी स्टोन-पेन) दुखू लागले. नंतर दुखण्याचे प्रमाण वाढतच गेले. मला पुष्कळ तापही आला. त्यातच मुसळधार पाऊस चालू झाला. बाहेर मुसळधार पाऊस पडत असतांना पोटातील दुखणे आणि ताप यांमुळे मला घाम येऊन माझे कपडे ओलेचिंब झाले होते. विजेचा कडकडाट आणि वार्यासह मुसळधार पाऊस पडत असल्याने काही ठिकाणी मार्गात भरपूर साचलेले पाणी गाडीच्या समोरील काचेच्याही वरपर्यंत उडत असल्याने काही वेळा मधे मधे रस्ताही दिसत नव्हता.
२ इ. ‘परात्पर गुरु वाहन चालवण्याची सेवा करवून घेणारच आहेत’, या विचाराने पुष्कळ बळ मिळून नाशिक ते संभाजीनगर वाहन चालवण्याची सेवा करू शकणे : मला मूतखड्यामुळे असह्य वेदना होत असल्याने आणि ताप पुष्कळ वाढल्याने रमेशदादांनी ‘वाहन मी चालवू का ?’, असे विचारले. तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘‘मी नुसता बसलो, तर माझे सर्व लक्ष वेदनांकडे जाऊन मला शांत बसता येणार नाही.’’ तेव्हा मला असेही वाटले, ‘आम्ही रात्री १२.३० ते १ वाजेपर्यंत संभाजीनगर येथे पोचणार. त्यानंतर जेवण आणि सत्संग होणार. त्यामुळे आम्हाला झोपायला ३ ते ४ वाजणार. पुन्हा सकाळी आवरून ८ वाजेपर्यंत सभागृहाच्या ठिकाणी पोचावे लागणार. त्यामुळे त्यांना आराम करू देऊया. परात्पर गुरु याही स्थितीत माझ्याकडून वाहन चालवण्याची सेवा करवून घेणारच आहेत.’ मला या विचाराने पुष्कळ बळ मिळून मी नाशिक ते संभाजीनगर वाहन चालवण्याची सेवा करू शकलो. हे केवळ परात्पर गुरुमाऊलीमुळेच शक्य झाले. त्यांच्या कृपेमुळेच अशी लीला होऊ शकते. रात्री १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास आम्ही संभाजीनगर येथे श्री. अशोक कुलकर्णी यांच्या घरी पोचलो. त्यानंतर डॉ. आरती तिवारी यांनी औषधोपचार केल्याने माझा पोटदुखीचा त्रास काही प्रमाणात न्यून झाला.
३. चित्रीकरणाची सेवा करायची असतांना झालेली मनाची स्थिती
३ अ. ‘चित्रीकरणाची सेवा करायला ऐन वेळी साधक न मिळाल्यास ‘संत-महंत यांचे महत्त्वाचे चित्रीकरण होऊ शकणार नाही’, या विचाराने अपराधीपणाची जाणीव होऊन अस्वस्थता जाणवणे : सकाळी उठल्यावर मला मूतखड्यामुळे होणार्या वेदनांचे प्रमाण अल्प होते; परंतु मला ताप होता. मी घामाने ओलेचिंब झालेले कपडे २ वेळा पालटले. सद्गुरु राजेंद्र शिंदे, श्री. रमेश शिंदे आणि अन्य साधक सकाळी लवकर सभागृहाच्या ठिकाणी गेले होते. ‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेने मिळालेली चित्रीकरणाची सेवा आजारपणामुळे करता येणार नसल्याने, तसेच ऐन वेळी या सेवेसाठी दुसरा साधक न मिळाल्यास एकाच व्यासपिठावर उपस्थित असलेले सात संत-महंत यांचे महत्त्वाचे चित्रीकरण होऊ शकले नाही, तर ते देवाला आवडणार नाही, या विचाराने अपराधीपणाची जाणीव होऊन मला अस्वस्थता जाणवत होती.
३ आ. चित्रीकरणाच्या वेळी परात्पर गुरुदेवांना शरण जाऊन आणि प्रार्थना करून जे सुचेल, त्याप्रमाणे प्रयत्न करणे अन् कार्यक्रम संपल्यावर श्री. रमेश शिंदे यांनी ‘सभेचे चित्रीकरण चांगले झाले’, असे सांगणे : मी सर्व आवरून सभागृहात पोचलो. मला ३० मिनिटांच्या सरावात जे शिकायला मिळाले होते आणि चित्रीकरणाच्या वेळी जे सुचेल, त्याप्रमाणे परात्पर गुरुदेवांना शरण जाऊन प्रार्थना करून कृती करण्याचा प्रयत्न केला. मी केलेले सभेचे चित्रीकरण श्री. रमेश शिंदे यांनी पाहिल्यावर त्यांनी चित्रीकरण चांगले झाल्याचे सांगितले.
‘ज्ञानेश्वर माऊलीने जसे रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले, त्याप्रमाणे परात्पर गुरुमाऊलीने या जिवाकडून प्रकृती ठीक नसतांना वाहन चालकाची सेवा आणि सभेच्या चित्रीकरणाची सेवा करवून घेतली’, असा विचार मनात येऊन ‘कर्ता-करविता’ परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त होऊन माझी भावजागृती झाली.’
– श्री. अशोक शांताराम दहातोंडे, शिरोडा, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. (२९.८.२०१७)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |