कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर कार्निव्हलचे आयोजन करण्यास नेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा विरोध

पणजी, १० फेब्रुवारी (वार्ता.) – कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर कार्निव्हलचे आयोजन करू नये आणि हा निर्णय धोकादायक ठरू शकतो. हा कार्निव्हल पर्यटकांसाठी आयोजित केला जातो. हा गोमंतकियांचा पारंपरिक कार्निव्हल नव्हे. त्यामुळे यंदा कार्निव्हल मिरवणूक रहित करावी, अशी मागणी सांताक्रूझचे माजी आमदार तथा काँग्रेसचे नेते व्हिक्टर गोन्साल्वीस यांनी व्यक्त केले.

आमदार व्हिक्टर गोन्साल्वीस पुढे म्हणाले, ‘‘पूर्वी गावपातळीवर कार्निव्हल होत होता आणि यामध्ये गावातील लोक सहभागी होत होते. आता कार्निव्हलला सरकारकडून साहाय्य केले जाते. त्यामुळे हा सरकारचा कार्निव्हल आहे आणि लोकांचा नव्हे. कार्निव्हलला लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. सरकार मनमानीपणे कार्यक्रमांना अनुमती देत आहे.’’ काही दिवसांपूर्वी नगरसेवक मिनीन डिक्रूझ, तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स यांनीही कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर कार्निव्हल महोत्सवाला विरोध केला होता. अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स यांनी कार्निव्हल महोत्सव रहित करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतांना म्हटले होते की, ‘आय.एस्.एल्.’ स्पर्धां पहायला लोकांना प्रवेश दिला जात नाही. कोरोना महामारीच्या काळात ‘कार्निव्हल महोत्सव’ हा कोरोनाचा वेगाने संसर्ग करणारा एक महोत्सव ठरू शकतो.

मडगाव येथील कार्निव्हल मिरवणुकीत मास्क न घालणार्‍याला २०० रुपये दंड ठोठावण्याचा नगरपालिकेचा निर्णय

मडगाव – येथे १४ फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या कार्निव्हलमध्ये मास्क न घालता सहभागी होणार्‍यांना २०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय मडगाव नगरपालिका मंडळाने घेतला आहे. मिरवणुकीच्या काळात सामाजिक अंतर पाळणे आणि मास्क घालणे या नियमांचे पालन होत आहे कि नाही यावर नगरपालिका निरीक्षण ठेवणार असल्याचे नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी सांगितले. (जमावावर निरीक्षण ठेवण्याएवढे कर्मचारी नगरपालिकेकडे आहेत का ? आणि पोलीसबळ तरी तेवढे आहे का ? – संपादक)