‘पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक जिवाचे रक्षण भगवंत करतो’, याची साधिकेला आलेली प्रचीती !

‘पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक जिवाकडे भगवंताचे लक्ष असते. कुणाची काहीही इच्छा असली, तरी त्याचे कुणीही बिघडवू शकत नाही; कारण भगवंत त्याचे रक्षण करणार असतो. याची प्रचीती मला श्री गुरूंच्या कृपेने एका प्रसंगातून आली.

परात्पर गुरु डॉ. आठवले
कु. कुहू पांडेय

वाराणसी सेवाकेंद्राच्या बाहेर एक झाड वाढलेले होते. त्या झाडाला योग्य आकार देण्यासाठी एका साधकाने त्याच्या वरच्या फांद्या छाटल्या होत्या. दुसर्‍या दिवशी सकाळी त्या झाडाकडे पाहिले, तर लक्षात आले, ‘जेथपर्यंत झाड कापले होते, त्याच फांदीवर एका चिमणीने घरटे केले होते आणि त्या घरट्यात तिने दोन लहान पिल्लांना जन्म दिला होता.’​

त्या घरट्याकडे पाहिल्यावर लक्षात आले, ‘जर तीच फांदी कापली गेली असती, तर चिमणीचे घरटे नष्ट होऊन त्यातील पिल्ले दगावली असती; परंतु देवानेच साधकाला तशी बुद्धी दिल्यामुळे ती फांदी कापली गेली नाही.’ त्या वेळी ‘सर्व ईश्‍वरेच्छेनेच घडते’, याची जाणीव झाली.

‘झाडाचे प्रत्येक पान ईश्‍वराच्या इच्छेने हलत असते’, असे गुरुदेव सदैव म्हणत असतात, तसेच आपल्याकडून घडणारी प्रत्येक कृती श्रीगुरूंच्याच कृपेने घडत असते. त्यामुळे ‘आपण सर्व जण ईश्‍वराच्या हातातील कठपुतली आहोत’, हे या प्रसंगातून मला शिकायला मिळाले. आपल्या अज्ञानामुळे ‘ही सेवा आम्ही करत आहोत’, असे आपल्याला वाटते; परंतु ईश्‍वरच सर्व करवून घेत असतो’, असे या प्रसंंगातून लक्षात आले. आपण केवळ निमित्तमात्र असतो.

‘येणार्‍या भीषण आपत्काळात आमचे कसे होणार ? येणार्‍या संकटाला कसे सामोरे जायचे ?’, असे साधकांच्या मनात भय होते; परंतु या प्रसंगामुळे श्रीगुरूंनी आमची श्रद्धा वाढवली. गवताच्या काडीप्रमाणे असलेल्या पक्षाच्या पिल्लांचा विचार श्रीगुरु करतात. आम्ही तर त्यांचे भक्त आहोत. आमची काळजी ते घेणार नाहीत का ? ‘आपल्या समवेत प्रत्येक क्षणी श्रीगुरु आहेत आणि आपण प्रत्येक क्षणी त्यांच्याच इच्छेने श्‍वास घेत आहोत’, याची जाणीव मनाला सतत असली पाहिजे.

‘हे गुरुदेवा, आम्हा सर्व साधकांची जीवनरूपी दोरी तुमच्याच हातात आहे, तरी आमचे रक्षण करा’, हीच आपल्या श्रीचरणी आर्ततेने प्रार्थना आहे.’

– कु. कुहू पांडेय, वाराणसी (२२.४.२०२०)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक