देवद आश्रमातील सौ. मीरा कुलकर्णी यांना लक्षात आलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुपमेयता आणि महानता !

साधकांच्या हृदयसिंहासनी विराजमान परात्पर गुरु डॉ. आठवले !

​‘देवाच्या कृपेने काही मासांपासून मला सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढावा सत्संगात बसण्याची संधी मिळाली. एका सत्संगात मला भावार्चना घेण्याची संधी मिळाली. त्या वेळी गुरुदेवांनी करवून घेतलेली भावार्चना त्यांच्याच चरणी अर्पण करत आहे.

१. गुरुदेवांना कोणतीही उपमा देता येणे अशक्य असणे

‘आपण सर्व जण एकत्र बसून मन शांत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत या साधनामार्गावर आपल्याला ज्या गुरुदेवांनी आणले, त्यांची आपल्याला प्रकर्षाने आठवण होत आहे. आपले गुरुदेव कसे आहेत ? त्यांचे वर्णन करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आपल्याला प्रश्‍न पडला आहे, ‘गुरुदेवांना कुणाची उपमा द्यावी ?’

सौ. मीरा मंगलकुमार कुलकर्णी

१ अ. परीस : गुरुदेव कसे आहेत ? त्यांना आपण परिसाची उपमा देऊया. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते; पण हेच सोने अन्य लोखंडाचे सोने करू शकत नाही. गुरुदेव जिवाला साधना शिकवतात, त्याला शिष्यपदी नेतात आणि पुढे तो शिष्य पुष्कळ जिवांना मार्गदर्शन करून स्वतः गुरुपदी विराजमान होतो. अशी आपल्या गुरुदेवांची महती आहे. ‘परिसाच्या उणेपणामुळे गुरुदेवांना आपण परिसाचीही उपमा देऊ शकत नाही’, हे आपल्या लक्षात आले.

१ आ. कल्पवृक्ष : आपण कल्पवृक्षाच्या खाली बसून जेवढी कल्पना करू, तेवढेच कल्पवृक्ष आपल्याला देतो; पण आपण काही न मागता गुरुदेव सदासर्वकाळ आपल्याला सर्वकाही देतच असतात.

१ इ. मेरु पर्वत : गुरुदेव कसे आहेत ? आपण त्यांना ‘मेरु पर्वता’एवढे विशाल बघतो; पण पर्वत तर अचेतन आहे आणि कठोर आहे. आपले गुरुदेव प्रेमस्वरूप, करुणाकर आणि दीनदयाळू आहेत; म्हणून त्यांना आपण ‘गुरुमाऊली’ संबोधतो. गुरुदेवांना आपण मेरु पर्वताचीही उपमा देऊ शकत नाही.

१ ई. पाणी : गुरुदेवांना पाण्याची उपमा द्यावी, तर पाणी चंचल असते. ते कधी कधी आटूनही जाते; पण गुरुदेवांचे तसे नाही. गुरुदेव नेहमी स्थिर, म्हणजे ब्रह्मस्थितीला असतात.

१ उ. अथांग महासागर : गुरुमाऊली अथांग महासागरासारखी आहे. तिचे अंतःकरण अथांग आहे; पण त्यांच्यात सागराच्या पाण्यासारखा खारटपणा नाही, तर त्यांच्यात अतिशय मधुरता आहे.

१ ऊ. श्रीमंत : गुरुदेवांना आपण श्रीमंतसुद्धा म्हणू शकत नाही; कारण व्यावहारिक श्रीमंती कधी ना कधी नाश पावणारी असते. हे ऐश्‍वर्य, हे ब्रह्मांड सर्व नाशवंत आहे; मात्र गुरुमाऊलीची कृपा अविनाशी आहे.

१ ए. शेषनाग : गुरुदेवांना शेषनागाची उपमा देऊया का ? शेषाने त्याच्या मस्तकावर केवळ पृथ्वीचा भार घेतला; परंतु आपले गुरुदेव तर अनंत कोटी ब्रह्मांडांचे नायक असूनही भाररहित आहेत.

१ ऐ. सूर्यदेव : गुरुदेव सूर्यदेवासारखे आहेत का ? ज्याप्रमाणे सूर्य उगवला की, अंधार दूर पळतो, त्याप्रमाणेच गुरुदेवांच्या कृपेने साधकांच्या आयुष्यातील अंधार आणि अज्ञान दूर होते. सूर्य अस्ताला गेला की, पुन्हा अंधार होतो; पण गुरुदेवांचे तसे नाही. त्यांची एकदा कृपा प्राप्त झाली की, साधकांच्या जीवनातील अंधार ते मुळासकट नष्ट करतात.

२. गुरूंची महानता !

२ अ. अढळ गुरुतत्त्व : गुरुदेवांचे पद, म्हणजे गुरुतत्त्व अढळ आहे. ते कल्पांतरी कधीही नाश पावणारे नाही. त्यामुळे त्यांची कुणाशीही तुलना केली, तरी ती अपूर्णच आहे.

२ आ. सर्वसामान्य जिवाला गुरुप्राप्ती होऊन गुरूंचा आशीर्वाद मिळाला की, असा जीव त्यांच्यात विलीन होणे : वरील विवेचनावरून या विश्‍वातील स्थूल डोळ्यांना दिसणार्‍या कोणत्याच वस्तूची उपमा आपण गुरुदेवांना देऊ शकत नाही आणि त्याचे वर्णनही करू शकत नाही; मात्र एखादा छोटासा ओहोळ किंवा छोटीशी नदी जेव्हा गंगेला मिळते, तेव्हा ती गंगामय होऊन जाते, तिचे वेगळेपण रहात नाही. त्याचप्रमाणे आपल्यासारख्या सर्वसामान्य जिवाला गुरुप्राप्ती होऊन गुरूंचा आशीर्वाद मिळाला की, असा जीव त्यांच्यात विलीन होतो.

२ इ. गुरुदेवांचे वर्णन करणे कल्पनेपलीकडचे असणे आणि त्यांना अनुभवता येण्यासाठी आपण कठोर परिश्रम करून निर्मळ अंत:करण करायला हवे ! : गुरुदेवांचे शब्दांत वर्णन करणे आपल्यासारख्या जिवाला अशक्य आहे. ते आपल्या कल्पनेपलीकडचे आहे. मग आपण काय करू शकतो ? आपण त्यांना केवळ अनुभवू शकतो; पण त्यांना अनुभवता येण्यासाठी अतिशय शुद्ध, सात्त्विक आणि निर्मळ असे आपले अंत:करण पाहिजे. स्वभावदोष आणि अहं नसलेल्या जिवांच्या अंतःकरणातच गुरुदेव निरंतर वास करतात आणि त्याची अनुभूती तो जीव घेऊ शकतो. त्यासाठी आपल्यालाही कठोर परिश्रम करायला पाहिजेत. गुरुदेवांना अनुभवण्यासाठी, म्हणजे त्यांना प्राप्त करण्यासाठी आपल्याला निस्सीम भक्ती करता आली पाहिजे. भक्ती कशी करायला हवी ? आपल्याला अर्जुनासारखी सख्यभक्ती, मारुतिरायांसारखी दास्यभक्ती किंवा शबरीसारखे निर्मळ प्रेम करता यायला पाहिजे. हे तरी आपण कुठे करू शकतो ? हे करण्याचीसुद्धा आपल्यामध्ये कोणतीच क्षमता नाही. मग ‘आपल्याला अशी भक्ती करता यावी’, यासाठी आपण गुरुदेवांच्याच चरणी शरणागतभावाने प्रार्थना करूया !’

– सौ. मीरा मंगलकुमार कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.१२.२०१९)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक