कोरोना योद्ध्यांचे अपघाती विमा प्रस्ताव मनपा प्रशासनाने नाकारले

कठीण काळात जिवाची पर्वा न करता सेवेत प्राण गमावणार्‍या कर्मचार्‍यांच्या वारसांनी काय करावे ? किरकोळ कारणे देऊन स्वतःच्या कर्मचार्‍यांचे प्रस्ताव नाकारणार्‍या प्रशासनाला कर्मचार्‍यांकडून पैशांची अपेक्षा आहे, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ? अशा प्रशासनावर कोण कारवाई करणार ?

नागपूर, १० फेब्रुवारी (वार्ता.) – येथील मनपा प्रशासनातील २५ कोरोना योद्धा सफाई कर्मचार्‍यांचा या कोरोना महामारीत मृत्यू झाला. यासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने ५० लाख रुपये अपघाती विमा देण्याचा निर्णय घेतला होता; मात्र या कर्मचार्‍यांच्या वारसांना नोकरी किंवा अपघाती विम्याचा लाभ मिळाला नाही.

यासाठी दिलेले प्रस्ताव प्रशासनाने किरकोळ कारणे देत नाकारले आहेत. यामध्ये महाराष्ट्र शासन पुणे यांच्या पत्रानुसार प्रकरण अपात्र आहे, विभाग प्रमुखांकडून प्रस्ताव आलेला नाही, विमा योजनेविषयी शासनाकडे पाठवले नाही, अशी कारणे देण्यात आली आहेत.

याविषयी अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे सचिव विक्की बढेल यांनी जिल्हाधिकारी, नागपूर आणि मनपा आयुक्त यांचेकडे तक्रार नोंदवून प्रसंगी आंदोलनाची चेतावणी दिली आहे.