यवतमाळ, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, तसेच खादी आयोग या ३ कार्यालयांच्या वतीने पी.एम्.ई.जी. आणि सी.एम्. ई.जी.पी. या योजना ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहेत. या योजनांच्या अंतर्गत विविध उद्योगांचे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांची त्या पोर्टलवर छाननी केली जाते. या प्रक्रियेमध्ये कार्यालयातील कर्मचार्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही खासगी व्यक्तीची अथवा संस्थेची नेमणूक कार्यालयाने केलेली नाही. काही व्यक्ती उद्योजक आणि कारागीर यांची महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या नावाचा गैरवापर करून लाभार्थ्यांकडून प्रकरणे संमत करून देण्याच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात रकमेची मागणी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे फसवेगिरी करणार्या व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करावी. ऑनलाईन अर्ज भरतांना कोणतीही अडचण आल्यास दूरध्वनी क्रमांक ०७२३२-२४४७९१ यावर संपर्क साधावा, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी कळवले आहे.