शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्राधान्य देणार ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

वर्धा – सध्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय झाला आहे. त्यामुळे आयुष्यातील यापुढील १० वर्षे मी शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न सोडवण्यास प्राधान्य देणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी येथे केली. येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापिठाच्या वतीने वर्धा मंथन-ग्रामस्वराज्याची आधारशीला या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलपती प्रा. रजनीशकुमार शुक्ल होते. (सहस्रो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यानंतर नितीन गडकरी आता असे विधान करत आहेत. शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ येण्यापूर्वीच आतापर्यंत सत्ता भोगलेल्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी शेतकर्‍यांच्या समस्यांकडे लक्ष दिले असते, तर शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याच नसत्या. नुसते बोलण्याऐवजी राज्यकर्त्यांनी कृतीद्वारे शेतकर्‍यांची प्रगती करून दाखवावी, अशी जनतेची अपेक्षा आहे. – संपादक)

मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले की, गाव, शेतकरी, कारागीर यांना केंद्रस्थानी ठेवूनच अर्थकारणातील पालट स्वीकारला पाहिजे. गांधी, विनोबा भावे, राममनोहर लोहिया, दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारात गरिबांच्या उन्नतीचे समान सूत्र आहे. या सूत्राद्वारेच तंत्रज्ञानावर आधारित पालट घडवण्याचा मानस आहे. खादीत ती ताकद आहे. ग्रामीण उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी विपणन व्यवस्था पालटली पाहिजे.

धान आणि कापूस ऊर्जानिर्मितीचा मोठा स्रोत ठरू शकते. त्याद्वारे इथेनॉल, बायोगॅसनिर्मितीस प्रोत्साहन दिल्यास शेतकर्‍याच्या आर्थिक परिस्थितीत पालट होईल. त्या दृष्टीने पूर्व विदर्भातील जिल्हे डिझेलमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. प्रक्रिया उद्योगातून शेतकर्‍यांचा भाजीपाला विदेशात जाऊ शकतो. चांगले पॅकेजिंग, ब्रॅडिंग केल्यास येथील सुप्रसिद्ध गोरसपाक हे उत्पादन जागतिक बाजारात लोकप्रिय ठरू शकते.