अभिनेत्री गहना वशिष्ठ हिला १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

पॉर्न व्हिडिओचे चित्रीकरण केल्याचे प्रकरण

अभिनेत्री गहना वशिष्ठ

मुंबई – वेब सिरीजच्या नावाखाली स्वतः प्रोडक्शन हाऊसद्वारे पॉर्नोग्राफिक व्हिडिओचे चित्रीकरण करून ते संकेतस्थळावर ठेवल्याच्या प्रकरणी अभिनेत्री आणि मॉडेल गहना वशिष्ठ हिला येथील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ६ फेब्रुवारी या दिवशी अटक केली होती. ८ फेब्रुवारी या दिवशी न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने तिला १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलिसांनी ३ फेब्रुवारी या दिवशी गहना हिच्या घरावर धाड टाकून तिच्या घरातून ३ भ्रमणभाष, १ भ्रमणसंगणक (लॅपटॉप) आणि काही अधिकोषांची कागदपत्रे जप्त केली होती.

चित्रपट क्षेत्रामध्ये स्वतःचे भवितव्य घडवण्यासाठी येणार्‍या तरुण आणि तरुणी यांना विविध आमीषे दाखवून त्यांना अश्‍लील व्हिडिओ निर्मितीसाठी काम करण्यास गहना भाग पाडत होती. त्यानंतर ते व्हिडिओ विविध संकेतस्थळावर प्रदर्शित करून लाखो रुपये कमवत असल्याचा तिच्यावर आरोप आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार गहना हिचे एक जिवी स्टुडिओ नावाने प्रॉडक्शन हाऊस आहे. ज्या माध्यमातून ती हे व्हिडिओ चित्रित करत होती. ती वर्ष २०१९ पासून अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत आहे. पोलिसांना आतापर्यंत जवळपास ९० अश्‍लील व्हिडिओ मिळाले आहेत. हे सर्व व्हिडिओ गहना वशिष्ठ हिच्या स्टुडिओमध्ये चित्रीत केले आहेत.