राज्यात १२ घंट्यांत ३ सहस्र ६२ खासगी बसगाड्यांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई !

  • आतापर्यंत अशी कारवाई का झाली नाही ? आतापर्यंत झालेल्या गुन्ह्यांना आणि हानीला कोण उत्तरदायी ?
  • केवळ एका दिवसात अशी कारवाई न करता प्रादेशिक परिवहन विभागाने नियमितपणे नियमांचे वारंवार उल्लंघन करणार्‍या खासगी बसगाड्यांवर अशी कारवाई केली असती, तर त्यांनी नियमांचे उल्लंघन केले नसते. 

नागपूर – नियम मोडणार्‍या खासगी बसगाड्या आस्थापनांना (ट्रॅव्हल्स) शिस्त लावण्यासाठी परिवहन खात्याने ५ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६ वाजल्यापासून ते ६ फेब्रुवारीच्या सकाळी ६ वाजेपर्यंत राज्यभरात ‘विशेष मोहीम’ राबवली. त्यात एकाच वेळी राज्यातील सर्व उपप्रादेशिक परिवहन विभागातील वरिष्ठ ते कनिष्ठ अधिकार्‍यांनी ३ सहस्र ६२ बसगाड्यांवर कारवाई केली. या कारवाईत नियमांचे गंभीर उल्लंघन करणार्‍या २१३ बसगाड्या जप्त करण्यात आल्या. सर्वाधिक कारवाई ठाणे आणि पुणे परिसरात करण्यात आली. परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी राज्यातील प्रत्येक प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांपासून ते साहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांपर्यंतच्या अधिकार्‍यांना या मोहिमेत सहभागी करून घेतले होते.

खासगी ‘ट्रॅव्हल्स’वर कारवाई का ?

  • विनापरवाना वा परवाना अटीचा भंग
  • टप्पा वाहतूक, योग्यता प्रमाणपत्र नसणे
  • प्रवासी बसमधून अवैध मालवाहतूक
  • वाहनामध्ये केलेले अनधिकृत केलेले फेरपालट
  • ‘रिफ्लेक्टर’, ‘इंडिकेटर’, ‘टेल लाईट’, ‘वायपर’ इत्यादी नसणे
  • क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक
  • मोटार वाहन कर न भरणे
  • प्रवाशांकडून अधिक भाडे आकारणे