|
नवी देहली – देवतांविषयी अवमानकारक विधान करून धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला एकपात्री विनोदी कार्यक्रम करणार्या मुनव्वर फारूकी याला सर्वाेच्च न्यायालयाने अंतरिम जामीन संमत केल्यानंतर त्याची इंदूर येथील कारागृहातून रात्री उशिरा सुटका करण्यात आली. केंद्रीय कारागृह प्रशासनाने प्रयागराज न्यायालयाने जारी केलेल्या वॉरंटचा हवाला देत फारूकी याला सोडण्यास ६ फेब्रुवारीला संध्याकाळी असमर्थता दर्शवली होती; मात्र नंतर कारागृहाच्या एका अधिकार्याने म्हटले, की, या प्रकरणी न्यायालयाने ५ फेब्रुवारीला दिलेल्या आदेशाला जवळपास ३० घंटे झाले आहेत. याच आधारावर फारूकीला रात्री उशिरा सोडण्यात आले.
दुसरीकडे एका वृत्तानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी इंदूरच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांना दूरभाष करून सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर जामिनावर सोडण्याचा आदेश तपासण्याचे आवाहन केले.