कंत्राटदारांच्या भ्रष्टाचाराविषयी मुंबई महापालिकेत निनावी पत्र

मुंबई – कंत्राटदार हातचलाखी करत असल्याचे निनावी पत्र महापालिकेत आले आहे. ‘सॅप’ प्रणालीमध्ये हस्तक्षेप करत काही मोजक्या कंत्राटदारांना साहाय्य केले जात असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

महापालिकेच्या आय.टी.चे कर्मचारी, सॅप कंत्राट दिलेल्या आस्थापनाचे कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्यामधील छुपी कार्यपद्धत उघड करण्याचा प्रयत्न तक्रारदाराने केला आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी असे कोणतेही पत्र त्यांना मिळाले नसल्याचे म्हटले आहे. भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पत्र मिळाले असल्याचा दावा केला आहे. महापौर आणि इतर गटनेते यांनाही हे पत्र मिळालेले नाही.